ठाणे: ठाणे जिल्हयात सर्व महानगरपालिका, तहसिल कार्यालय, उपविभागीय कार्यालय, नगरपरिषद, नगरपंचायत, सह निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद शिक्षण विभाग स्तरावर कुणबी नोंदी शोध मोहीम सुरु असून आतापर्यंत एक लाख ३६,१०१ कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत.
ठाणे तालुक्यात 9,462, भिवंडीत 25,654, कल्याणमध्ये 8,564, उल्हासनगरमध्ये 36, अंबरनाथमध्ये 1,185, शहापूरमध्ये 58,374, मुरबाडमध्ये 32,814, मीरा-भाईंदरमध्ये 8 अशा एकूण एकूण एक लाख 36,101 नोंदी मिळाल्या आहेत.
या नोंदी तालुका स्तरावर स्कॅनिंग करुन ठाणे जिल्हयातील www.nic.in या वेबसाईटवर अपलोड करण्यात आल्या आहेत. तसेच ज्या मोडी माषेमध्ये नोंदी आढळून आल्या आहेत, त्यांचे भाषांतर करुन वेबसाईटवर अपलोड करण्यात आले आहे. या आढळलेल्या नोंदीची यादी तालुक्यातील गावनिहाय ग्रामपंचायतींमध्ये प्रसिध्द करण्याची कार्यवाही सुरु आहे. २४ ऑक्टोबर २०२३ पासून आजपर्यंत एकूण ३५४२ कुणबी दाखले उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत संबंधितांना देण्यात आले आहेत. तसेच ज्या गावात कुणबी नोंदी आढळल्या आहेत अशा गावांच्या ठिकाणी विशेष शिबीर आयोजित करुन दाखले वाटप करण्याची कार्यवाही सुरु आहे.
ज्या गावात कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत, तेथील नागरिकांनी नोंदीनुसार जात प्रमाणपत्र घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.