पाणीगळती-पाणीचोरीवर ठामपाचा ‘स्मार्ट’ उतारा

गृहसंकुलांमध्ये ९६ हजार
स्मार्ट मीटर कार्यरत

ठाणे :
पाणी गळती आणि पाणी चोरीला लगाम लावण्यासाठी ठाणे शहरात आतापर्यंत ९६ हजार स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. केवळ २० टक्केच मीटर बसवण्याचे शिल्लक आहेत. तसेच पाणीपट्टीची वसुली स्मार्ट मीटर प्रमाणेच करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

पाण्याचा वापर योग्य पध्दतीने व्हावा, किती पाणी आले, किती वापरले गेले या उद्देशाने स्मार्ट मीटरची संकल्पना पुढे आली. त्यानुसार २०१९ मध्ये महापालिकेच्या माध्यमातून मीटर बसविण्याचे काम सुरु झाले. महापालिका हद्दीत १ लाख १३ हजार ३२८ मीटर बसविले जाणार आहेत. आतापर्यंत ९५ हजार ५०० मीटर बसविण्यात आले आहेत. त्यानुसार गृहसंकुलांच्या ठिकाणी मीटर बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यानुसार तेथील रहिवाशांना आता मीटरनुसारच बिले पाठविले जात आहेत.

मागील वर्षी स्मार्ट मीटरद्वारे ७० हजार ग्राहकांना बिलांचे वाटप करण्यात आले आहे. परंतु आधीच्या आणि आताच्या बिलांमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्याची माहिती समोर आली होती. ही देयके अधिक असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे येऊ लागल्या होत्या. त्यानुसार झोपडपट्टी भागात सध्या हे मीटर बसविण्यात येऊ नये असा सुरही लावण्यात आला होता.

झोपटपट्टी भागात विरोध कायम

झोपडपट्टी भागातच मीटर बसविण्याचे २० टक्के काम शिल्लक असल्याचे पाणी पुरवठा विभागाने सांगितले आहे. त्यानुसार लोकमान्य नगर, कोपरी-आनंद नगर, बाळकुम, वाघबीळ, ओवळा आदींसह इतर काही गावपाड्यांच्या ठिकाणी ही कामे शिल्लक असल्याचेही सांगण्यात आले आहे. आधीचा विरोध पाहता आता या ठिकाणी पुन्हा विरोध वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथेच आता पालिकेला अधिकची कसरत करावी लागणार आहे.

मुंब्य्रात मात्र टप्याटप्याने मीटर बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तर कळवा, दिवा भागातही मीटर बसविण्याचे काम सुरु असल्याचा दावा करण्यात आला आहे.