* कंत्राटदारांची देणी दोन हजार कोटी
* ठाणेकरांवर शुल्कवाढीचा बोजा
* जमा खर्चाचा ताळमेळ घालण्यासाठी तारेवरची कसरत
ठाणे: ठाणे महापालिका यावर्षी सहा हजार कोटींचा टप्पा पार करण्याची शक्यता असून जलवाहिनी जोडणी आणि परिवहनच्या तिकीटदरात वाढ होण्याचा अंदाज महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
महापालिकेचा अर्थसंकल्प उद्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांना सादर केला जाणार आहे. यावर्षी मार्च महिन्यात बजेट सादर केला जात असल्याने कोणत्याही प्रकारची करवाढ करता येत नाही. त्यामुळे प्रशासनाकडून नळ जोडणीकरिता लागणारे शुल्क वाढविण्याची शक्यता आहे तसेच अन्य काही बाबींवर देखिल शुल्क वाढीची तलवार असणार आहे.
महापालिकेच्या परिवहन विभागाची आर्थिक स्थिती अतिशय बिकट असून या विभागाच्या वतीने तिकीट दरात वाढ करण्याचा प्रस्ताव येण्याची शक्यता देखिल व्यक्त केली जात आहे. मागिल वर्षी महापालिकेचा अर्थसंकल्प ५४०० कोटींचा होता, त्यामुळे यावर्षी अर्थसंकल्प सुमारे सहा हजार कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाला यावर्षी ९०० कोटींचे उद्दिष्ट दिले होते, ते पुढील वर्षाकरिता ११०० कोटी इतके होण्याची शक्यता आहे. पाणीपट्टीचे उद्दिष्ट २५० कोटी इतके होते, त्यामध्ये देखिल २५ ते ५० कोटींची वाढ होण्याची शक्यता आहे. शहर विकास विभागाला ५५० कोटींचे उ
उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यामध्ये देखिल वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अग्निशमन, जाहिरात, त्याचबरोबर महापालिका कर्ज रोखे आदी मुख्य उत्त्पन्न स्रोतांचे उद्दिष्ट वाढवून महापालिकेचा अर्थसंकल्प सुमारे सहा हजार कोटींचा टप्पा ओलांडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे उद्या महापालिका आयुक्त ठाणेकरांना नवीन कोणत्या नागरी सुविधा देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापालिकेला ठेकेदारांची सुमारे दोन हजार कोटींची देणी देणे बाकी असून मिळालेल्या उत्पन्नातून वेतन आणि नागरी सुविधा तसेच ठेकेदारांची देणी देताना महापालिका प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.