‘अर्बन हीट आयलंड’मुळे ठाण्याला दुहेरी धोका
ठाणे: जागतिक हवामान दिनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात उष्णतेचा पारा आणि हवेतील सल्फर डायऑक्साइड, ओझोन व घातक धूलिकणांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. मार्चच्या सुरुवातीलाच तापमानाने ४१ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठल्याने ठाणेकर होरपळून निघत आहेत. जागतिक हवामान दिनाच्या पार्श्वभूमीवर या नोंदी धोक्याच्या असल्याचे मत तज्ज्ञ मंडळी व्यक्त करत आहेत.
महापालिकेकडून मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, चालू महिन्यातील पहिल्या २० दिवसांपैकी तब्बल १० दिवस हवा अतिशय दूषित नोंदवली गेली आहे. यामध्ये ओझोनची पातळी १८८ पर्यंत पोहोचली असून, धूलिकणांचे (PM10) प्रमाण १३० च्या आसपास नोंदवले गेले आहे. वातावरणातील या बदलांमुळे शहराच्या हवेची गुणवत्ता ढासळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तज्ज्ञांच्या मते, वाढती उष्णता आणि प्रदूषण यांचा परस्पर संबंध अतिशय घनिष्ठ आहे. कडक उन्हामुळे जमिनीलगत वाहनांचा धूर, औद्योगिक उत्सर्जन आणि बांधकामातील धूळ यांची रासायनिक प्रक्रिया होऊन ओझोनसारख्या घातक वायूंची निर्मिती वाढते. हे प्रदूषक ‘सायलेंट किलर’ ठरत असून, यामुळे दमा, श्वसनाचे विकार आणि हृदयविकाराचा धोका वाढल्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.
ठाणे-मुंबई परिसरात झपाट्याने होणारे काँक्रीटीकरण आणि घटते हरित क्षेत्र यामुळे शहरात ‘अर्बन हीट आयलंड’ प्रभाव वाढत आहे. सिमेंटची जंगले दिवसा उष्णता शोषून घेत असल्याने रात्रीच्या वेळीही नैसर्गिक थंडावा मिळेनासा झाला आहे. वाढती वाहनसंख्या आणि ठिकठिकाणी सुरू असलेली बांधकामे या परिस्थितीला अधिक भयावह बनवत आहेत.
पर्यावरण अभ्यासकांनी ही स्थिती हवामान बदलाच्या व्यापक संकटाचा भाग असल्याचे म्हटले आहे. यावर मात करण्यासाठी प्रशासनाने बांधकाम धूळ रोखणे, सार्वजनिक वाहतूक सक्षम करणे आणि मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणे आता अनिवार्य झाले आहे. जागतिक हवामान दिन हा केवळ औपचारिक कार्यक्रम न ठरता, पर्यावरण संवर्धनासाठी ती एक ठोस कृतीची हाक ठरावी.
४१ अंश सेल्सिअस तापमान आणि १८८ पर्यंत पोहोचलेली ओझोनची पातळी हा ठाणेकरांच्या आरोग्यासाठी ‘रेड अलर्ट’ आहे. सिमेंटच्या जंगलांमुळे शहराचे रूपांतर ‘अर्बन हीट आयलंड’ मध्ये झाले असून, रात्रीही नैसर्गिक थंडावा मिळेनासा झाला आहे. प्रशासनाने आता केवळ कागदी घोडे न नाचवता, प्रदूषण नियंत्रण आणि हरित क्षेत्र वाढवण्यासाठी युद्धपातळीवर ठोस कृती करणे अनिवार्य आहे; अन्यथा ठाणे राहण्यायोग्य उरणार नाही, अशी भीती पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रशांत सिनकर यांनी व्यक्त केली आहे.
ओझोन वरच्या वातावरणात असेल तर ते आपल्याला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवते पण जमिनीच्या जवळ जास्त प्रमाणात असेल तर ते प्रदूषण मानले जाते. सध्या ठाण्यात जमिनीजवळ असलेल्या ओझोनचे प्रमाण १८८ असल्याने ते अस्वास्थ्यकारक श्रेणीत मोडते.