मुंबईतील जमीन व्यवहार ठाण्यात भोवला
ठाणे: जमीन महसूल प्रकरणांमध्ये गंभीर अनियमितता केल्याच्या आरोपावरून मुंबई पश्चिम उपनगरातील तत्कालीन उपविभागीय अधिकारी तसेच सध्या ठाणे महापालिकेत प्रतिनियुक्तीवर उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले उमेश बिरारी यांना राज्य शासनाने तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. महसूल व वन विभागाने 24 एप्रिल रोजी याबाबत आदेश जारी केला.
शासनाच्या आदेशानुसार, मुंबई उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना उमेश बिरारी यांनी आपल्या कार्यकाळात विविध जमीन प्रकरणांमध्ये नियमबाह्य निर्णय घेतल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. जमीन व्यवहारांमध्ये चुकीचे मूल्यांकन करणे, शासनाला आर्थिक तोटा होईल असे निर्णय घेणे तसेच वरिष्ठांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचे नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या विरोधात विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.
या प्रकरणातील आरोपांचे गांभीर्य लक्षात घेता, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियमांनुसार त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे निश्चित करण्यात आले असून, पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली आहे.
उमेश बिरारी यांची चार वर्षांपूर्वी राज्य शासनाने ठाणे महापालिकेत प्रतिनियुक्त अधिकारी म्हणून वर्णी लावली होती. शंकर पाटोळे लाच प्रकरणानंतर बिरारी यांच्यावर अतिक्रमण विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. सध्या त्यांच्याकडे जनसंपर्क विभाग अतिक्रमण विभाग आणि आरोग्य विभाग या तीन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या होत्या. मात्र भूतकाळात केलेले घोटाळे आता उघडकीस आल्यामुळे त्यांना मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. दरम्यान या निलंबनाच्या कारवाईमुळे ठाणे महापालिकेत खळबळ उडाली आहे.