भरवस्तीत रिंग मेट्रोचे स्थानक; कोंडी फुटणार नाही, वाढणार

* घोडबंदर भागातील रहिवाशांचे आक्षेप
* आमदार संजय केळकर यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

ठाणे: ठाण्यात रिंग मेट्रो प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली असून घोडबंदर भागात भरवस्तीत स्थानक उभे राहणार असल्याने वाहतूक कोंडीची समस्या सुटण्याऐवजी नागरिकांची कोंडी होणार असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. याबाबत शासकीय विश्रामगृहात झालेल्या संयुक्त बैठकीत आमदार संजय केळकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून योग्य मार्ग काढण्याच्या सूचना मेट्रो अधिकाऱ्यांना केल्या.

ठाणे शहरातील अंतर्गत वाहतुकीवरील ताण दूर करण्यासाठी रिंग मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतीने होणाऱ्या या प्रकल्पासाठी १२ हजार कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आलेली आहे. टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून पुढील कामेही लवकरच सुरू होणार आहेत. या प्रकल्पाचा मार्ग २९ कि.मी.असून काही मार्ग जमिनीखालून तर काही जमिनीवरून असणार आहे. हा मार्ग ज्या ठिकाणांहून जाणार आहे, त्या परिसरातील नागरिकांनी अनेक तक्रारी आमदार संजय केळकर यांच्याकडे केल्या आहेत. त्या अनुषंगाने श्री.केळकर यांनी शासकीय विश्रामगृहात संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी हिरानंदानी मेडोज, रोडाज, ऋतू इस्टेट, हिरानंदानी इस्टेट आदी भागातील रहिवाशांचे प्रतिनिधी, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक आणि ठाणे शहरातील प्रकल्पाचे मुख्य अधिकारी उपस्थित होते.

ज्या ठिकाणी हजारो नागरिक वास्तव्य करतात, शाळा, दवाखाने यामुळे नेहमीच वर्दळ असते, अशा ठिकाणी स्थानक उभारल्यास या परिसराची कोंडी होणार असल्याच्या तक्रारी रहिवाशांच्या प्रतिनिधींनी या बैठकीत केल्या. यावेळी श्री.केळकर यांनी या परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून लोकहिताचा मार्ग काढण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. बैठकीत अनेक आक्षेपांवर चर्चा करण्यात आली. त्यानुसार लवकरच प्रत्यक्ष पाहणी करून यातून मार्ग काढण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.