शिंदे गटाविरोधात ठाकरे गट, भाजप आणि मनसे भिडली!

नाना-नानी पार्कच्या जागेवर आरोग्य केंद्राचा कंटेनर

संत ज्ञानेश्वरनगर येथे तणाव, पोलिसांचा बंदोबस्त

ठाणे: संत ज्ञानेश्वर नगर येथे नाना- नानी पार्कच्या जागेवर शिंदे गटाकडून आरोग्य केंद्र उभारण्याचा घाट घातला जात आहे. आरोग्य केंद्रासाठी ही जागा अयोग्य असल्याने ठाकरे गट, भाजप आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध करत आरोग्य केंद्राचा कंटेनर घेऊन येणाऱ्या ट्रकला रोखले. यावेळी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांत जोरदार राडा झाला. पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्याने कोणतीही अनुचित घटना घडली नसली तरी परिसरात मोठा तणाव पसरला होता.

ठाण्याच्या प्रभाग क्रमांक १३मधील ज्ञानेश्वरनगर भागात लहान मुलांना खेळण्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेले उद्यान पडीक अवस्थेत असून याठिकाणी पुन्हा नाना-नानी पार्कच्या दुरुस्तीचा प्रस्ताव ठाकरे गटाचे एकमेव स्थानिक नगरसेवक शहाजी खुस्पे यांनी पालिका प्रशासनाला दिला. मात्र, शिंदे गटाकडून या जागेवर आरोग्य केंद्र उभारण्याचा घाट घालण्यात येत आहे. मुळात त्या ठिकाणी दोन शौचालये आणि बाजूला भलामोठा नाला असल्याने येथे आरोग्य केंद्र उभारू नये अशी स्थानिकांनी मागणी केली आहे. आता त्याच जागेवर कंटेनर ठेवण्यासाठी एका रात्रीत काँक्रीटीकरण करण्यात आल्यानंतर आज कंटेनर ठेवण्यात आल्याने स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध केला आहे.

स्थानिक नागरिकांनी याप्रकरणी भाजप आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन तक्रार नोंदवली होती. नाना नानी पार्कला कोणताही धक्का लावण्यात येऊ नये, उलट आणखी निधी उपलब्ध करून हे पार्क सुसज्ज करण्यात यावे, अशा स्पष्ट सूचना श्री. केळकर यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. आरोग्य केंद्राची परिसराला गरज आहे, पण ते उभारण्यासाठी नाना नानी पार्क ही जागाही योग्य नाही, अशी तंबी त्यांनी अधिकाऱ्यांना दिली होती.

स्थानिक नागरिकांनी आरोग्य केंद्राचा कंटेनर घेऊन आलेला ट्रक अडवून धरला. आरोग्य केंद्र उभारणीवरून वाद उफाळून आल्याने वागळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटात शाब्दिक बाचाबाची देखील झाली. त्यानंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दरम्यान, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना आवारण्याऐवजी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना धक्काबुकी केल्याने वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहचला.