स्टेट बँकेकडून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागास रुग्णवाहिका

ठाणे: जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागास भारतीय स्टेट बँकेतर्फे आज 24 जानेवारी 2024 रोजी रुग्णवाहिका सुपूर्द करण्यात आली.

भारतीय स्टेट बँकेच्या व्यावसायिक सामाजिक दायित्व (सी.एस.आर.) अंतर्गत घेण्यात आलेल्या या रुग्णवाहिकेची चावी मुंबई मेट्रो सर्कल भारतीय स्टेट बँकेचे महाव्यवस्थापक जुही सिन्हा यांच्या हस्ते जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्याकडे देण्यात आली.

याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डाँ. गंगाधर परगे, भारतीय स्टेट बँक, ठाणे विभाग, मुंबई मेट्रो सर्कलचे उप महाव्यवस्थापक रामकुमार तिवारी, सहाय्यक महाव्यवस्थापक पंकजकुमार पाठक, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील भारतीय स्‍टेट बँकेचे मुख्य प्रबंधक अवधुत तिरवडकर तसेच भारतीय स्टेट बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रीमती सिन्हा यांनी भारतीय स्टेट बँक ही अग्रगण्य शासकीय बँक असून या बँकेतर्फे नागरिकांना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे सांगितले. यापुढेही या सेवा अधिक उत्तमरित्या देण्यासाठी ही बँक कटीबध्द असून व्यावसायिक सामाजिक दायित्व (सी.एस.आर.) अंतर्गत देखील आपली सामाजिक जबाबदारी अधिक सक्षमतेने पार पाडण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.