भूसंपादनाला वेग; ऐरोली-काटई फ्री-वे गतिमान!

कल्याण : मुंबईच्या मुक्त मार्गाच्या (फ्री वे) धर्तीवर उभारण्यात येत असलेला आणि नवी मुंबई ते डोंबिवली अंतर काही मिनिटांवर आणणाऱ्या ऐरोली काटई मुक्त मार्गाच्या उभारणीतील कोंडी लवकरच फुटणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील या मार्गाच्या उभारणीसाठी आवश्यक जागेच्या उपलब्धतेसाठी भूसंपादन अधिकाऱ्यांनी नोटीस जाहीर केली आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने साकारण्यात येत असलेल्या या प्रकल्पामुळे डोंबिवली ते नवी मुंबई हे अंतर अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात पार करता येणार आहे.

खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने मतदारसंघातील वाहतूक जलद व्हावी यासाठी अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. मेट्रो १२, मेट्रो ५ आणि मेट्रो ५ चा उल्हासनगर,अंबरनाथ बदलापूर तसेच टिटवाळ्यापर्यंत विस्तार, विविध महत्वाचे उड्डाणपूल, रेल्वे उड्डाणपूल, सॅटिस यांसारखे अनेक मेगा प्रकल्प कल्याण लोकसभा मतदारसंघात राबविण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर खासदार डॉ.शिंदे त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कल्याण-डोंबिवली ते नवी मुंबई हे अंतर कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून ऐरोली ते काटई फ्री वेची निर्मिती केली जाते आहे.

या मार्गात ऐरोली भागातील खाडीपासून या मार्गाची सुरूवात होते. तर हा मार्ग डोंबिवलीजवळील काटई चौकात येऊन उतरणार आहे. हा मार्ग पूर्णपणे उन्नत असून हा मार्ग शिळफाटा येथील डोंगरातून ऐरोलीला जातो. यातील बोगदा तयार असून ऐरोली दिशेच्या बहुतांश भागाचे काम पूर्ण झाले आहे. तर मुंब्रा वाय जंक्शन पुलावरून या रस्त्याची मार्गिका जाते. बोगदा आणि बोगद्यातून येणारा मार्ग मुंब्रा वाय जंक्शन पुलावर येऊन थांबला आहे.

पुढच्या टप्प्यातील कामासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने या मार्गाचे काम रखडले होते. ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात येणाऱ्या या भागातील भूसंपादन करून प्रकल्प मार्गी लावण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे प्रयत्नशील होते. अखेर या मार्गात आवश्यक जागेचे भूसंपादन करण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून नोटीस जाहीर करण्यात आली आहे. यात आवश्यक जागेचा तपशील आणि गावांच्या नावांची माहिती देण्यात आली आहे. सध्याच्या घडीला ही जागा खुली आहे, त्यामुळे कोणत्याही भूखंडधारकाचे यात विस्थापन होणार नाही. तसेच पुनर्वसन किंवा पुनर्वसाहतीचाही प्रश्न उद्भवत नाही. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यास ऐरोली ते काटई मार्गाच्या उभारणीला गती मिळेल.

ऐरोली-काटई नाका कॉरिडॉर हा एमएमआरडीएच्या एकात्मिक, भविष्यासाठी सज्ज पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टिकोनात परिवर्तन घडवून आणण्यास सज्ज आहे. प्रमुख शहरी केंद्रांमध्ये लक्षणीयरीत्या जलद, सुरक्षित आणि अधिक कार्यक्षम प्रवास शक्य करून, हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशातील वाहतुकीच्या पद्धतींना नव्याने आकार देणार आहे, प्रमुख शहरांना जवळ आणणार आहे आणि प्रादेशिक वाहतूक अधिक सुलभ करणार आहे. हा प्रकल्प कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक घडामोडींसाठी एक महत्त्वपूर्ण आधारस्तंभ म्हणून काम करेल, तसेच लाखो लोकांचा दैनंदिन प्रवास अधिक वेगवान करेल.

ऐरोली-काटई रस्त्याच्या उभारणीसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याबाबत नुकतेच नोटीस जाहीर करत माहिती देण्यात आली आहे.

ऐरोली-काटई मुक्त मार्गाच्या उर्वरित भागाच्या उभारणीसाठी १८.३३ हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात येत आहे. यामध्ये देसाई गावातील १०.३ हेक्टर, डावले ४.९२ हेक्टर, शीळ २.१२ हेक्टर, कौसा ०.५७ हेक्टर, डोखाळ ०.४२ हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे.