बदलापूर: काही दिवसांपूर्वीच कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षांसह २५ नगरसेवकांनी इंदूरचा अभ्यास दौरा केला आहे. त्यानंतर आता बदलापूर शहरात इंदूर शहराच्या धर्तीवर स्वच्छता राबविण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून त्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.
बदलापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांच्यासमवेत २५ नगरसेवकांनी नुकताच इंदूर शहराचा तीन दिवसीय अभ्यास दौरा केला होता. बदलापूर शहराची स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन यंत्रणेला सक्षम करण्याच्या दृष्टीने स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूर शहरातील कचरा व्यवस्थापन पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या दौऱ्यात उज्जैन महापालिकेला सदिच्छा भेट देऊन त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीचा सखोल अभ्यास करण्यात आला. या भेटीदरम्यान विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून शहरातील स्वच्छता व्यवस्थापन, कचरा प्रक्रिया, पाणीपुरवठा, रस्ते व्यवस्थापन आणि नागरिकांच्या सहभागाबाबत माहिती घेण्यात आली. शहरातील स्मार्ट सिटी उपक्रम, सीसीटीव्ही व्यवस्थापन, सार्वजनिक स्वच्छतागृहांची देखभाल, तसेच पर्यावरणपूरक प्रकल्प यांचाही आढावा घेण्यात आला. उज्जैनच्या यशस्वी मॉडेलचा अभ्यास करून आपल्या शहरातही स्वच्छता, व्यवस्थापन आणि नागरिक सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी नवीन उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. त्यानुसार बदलापुरात घनकचरा व्यवस्थापनात इंदूरमधील व्यवस्थेचा अवलंब केला जाणार असल्याची माहिती नियोजन व विकास समिती सभापती संभाजी शिंदे यांनी दिली.
इंदूरमध्ये नगर परिषदेमार्फत शहरात स्वच्छता केली जाते. वर्गीकृत केलेला कचरा तसेच घरोघरी संकलित केलेला वर्गीकृत कचरा प्रकल्पापर्यंत पोहचवला जातो. त्यापुढे इंदूर शहरात कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून वेगवेगळ्या प्रकारची २८ उत्पादने घेतली जातात. कचऱ्यातून तयार झालेले खत उद्यानासाठी वापरले जाते. मिथेन गॅस पालिकेच्या वाहनांसाठी वापरला जातो. विशेष म्हणजे या प्रकल्पाची उभारणी ठेकेदारांकडूनच करण्यात आली आहे. नगरपालिकेने फक्त जागा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे नगरपालिकेला कचरा प्रकल्पातून दरमहा उत्पन्न मिळत आहे. बदलापूर नगर परिषदेने अशा प्रकारचा प्रकल्प राबविण्यासाठी प्राधान्य देण्याची गरज सभापती शिंदे यांनी व्यक्त केली.
घनकचरा संकलनावर आणि सफाईच्या कामावर जीपीएस यंत्रणेच्या माध्यमातून नियंत्रण ठेवले जाते. यासाठी नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. त्यामुळे कुठे कचरा सफाई झाली, कुठे घंटागाडी पोहचली याची माहिती प्रशासनाकडे असल्याने घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे होत आहे. त्याच धर्तीवर बदलापुरात यंत्रणा राबविल्यास घनकचरा व्यवस्थापनात आमूलाग्र बदल होऊ शकेल, असा मनोदय देखील सभापती शिंदे यांनी बोलून दाखवला.