बौद्ध धम्म ही सामाजिक-राजकीय क्रांती – एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘बुद्ध रत्न’ पुरस्कार प्रदान
ठाणे: “बौद्ध हा केवळ धर्म नसून ती एक व्यापक सामाजिक विचारसरणी आहे. तो फक्त श्रद्धेचा विषय नाही, तर परिवर्तनाची चळवळ आहे. ही केवळ धार्मिक क्रांती नसून सामाजिक आणि राजकीय क्रांती होती. बुद्धांचे विचार हे प्रवचनापुरते मर्यादित नसून आचरणासाठी आहेत. बुद्ध पेरले की बाबासाहेब उगवतात,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
सम्राट अशोक जयंतीचं औचित्य साधून ठाण्यात आठव्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. बुद्धरत्न सागर वेलफेअर फाउंडेशनतर्फे गडकरी रंगायतन येथे हा कार्यक्रम पार पडला. या वेळी मार्गदर्शन करताना शिंदे बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला “नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय” या मंत्रोच्चारांनी वातावरण भारावले. भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून शिंदे यांनी उपस्थित भिक्खू संघ, विद्वान, विचारवंत आणि धम्मप्रेमी बांधव-भगिनींचं स्वागत केलं.
या वेळी खासदार ज्योती वाघमारे, महापौर शर्मिला पिंपळोलकर, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, प्रवक्ते किरण सोनावणे, तसेच विविध देशांतून आलेले भिक्खू-भन्ते रत्नप्रिय थेरो, विशुद्धारत्न महाथेरो, विनय बोधी महाथेरो, शांतीप्रिय थेरो, भंते डॉ. राजरत्न थेरो, रत्नप्रिय थेरो, तसेच बौद्ध अनुयायी उपस्थित होते.
ठाण्याच्या ऐतिहासिक वारशाचा उल्लेख करत शिंदे म्हणाले की, सम्राट अशोक आणि सातवाहन काळात या भूमीत बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला होता. कान्हेरी लेणी आणि प्राचीन सोपारा (नालासोपारा) येथील स्तूप व शिलालेख हे त्याचे पुरावे आहेत. त्यामुळे ठाण्यात ही परिषद होणं अभिमानास्पद असल्याचं त्यांनी सांगितलं.
धम्म परिषद ही धम्मचळवळीतील महत्त्वाची घटना असल्याचं सांगत त्यांनी आयोजक भंते रत्नप्रिय थेरो आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं कौतुक केलं. भिक्खू संघाला संघदान करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत, “संघदान ही केवळ परंपरा नसून भिक्खू संघाच्या माध्यमातून बुद्धांच्या शिकवणीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना आहे,” असं ते म्हणाले.
या परिषदेत शिंदे यांना ‘बौद्ध रत्न’ पुरस्कार देण्यात आला. या सन्मानाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त करत, “अशा पुरस्कारांमुळे जबाबदारी वाढते आणि समाजासाठी अधिक काम करण्याची प्रेरणा मिळते,” असं सांगितलं.
जगातील वाढत्या युद्धपरिस्थितीचा संदर्भ देत त्यांनी इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणावाचा उल्लेख केला. “द्वेषाने द्वेष संपत नाही, प्रेमानेच तो शांत होतो,” हा बुद्धांचा संदेश आजच्या काळात अधिक महत्त्वाचा असल्याचं त्यांनी नमूद केलं. “जगाला युद्ध नको, बुद्ध हवा,” असा संदेश त्यांनी दिला.