समृद्धी महामार्गाच्या ठेकेदार कंपनीचा मंदगती कारभार

फेज १६ च्या दरम्यानच्या कामात दिरंगाई

शहापूर : तालुक्यातील शहापूर-मुरबाड मार्गावरील कोळकवाडी येथे बांधलेल्या समृद्धी महामार्गाच्या पुलाखालील म्हणजे ५४८ ‘ए’ महामार्गावरील पॅकेज नंबर १६ मधील इंटरचेंज रस्त्यावरील कामात सुसूत्रता नसल्याने शहापूर-मुरबाड असा प्रवास करणाऱ्या वाहचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. यामुळे येथे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता बळावली आहे.

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील फेज क्रमांक १६ कोळकेवाडी टोलनाका येथील पुलाखालील रस्ता समांतर न बनवल्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा होत आहे, शिवाय मागील सहा महिन्यांपासून समृद्धी महामार्गाच्या फेज नंबर १६ मध्ये संथ गतीने काम सुरू असून मे.नवयुग इंजिनीअरिंग ठेकेदार कंपनीकडून याबाबत जाणीवपूर्वक चालढकल होत असल्याचे दिसून येत आहे. हा रस्ता शहापूर व मुरबाड तसेच कर्जत, खोपोली, कल्याण, बदलापूर, माळशेज आदी तालुक्यांना व मुख्य शहरांना जोडला गेलेला असल्याने या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते.

दरम्यान महामार्गाच्या फेज १६मधील कोळकेवाडी टोल नाक्याजवळील रस्त्याचे भिजत घोंगडे मागील सहा महिन्यांपासून आहे. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

या रस्त्यावरचे काम मागील सहा महिन्यांपासून धिम्या गतीने सुरु असून या मार्गावरून आम्हाला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे, अशी प्रतिक्रिया लेनाड येथील ग्रामस्थ योगेश भोईर यांनी दिली.