पालिका शाळेच्या बंद धोकादायक इमारतीत दारूच्या बाटल्यांचा खच

मनसेची नवीन मराठी शाळा बांधण्याची मागणी

डोंबिवली : पूर्वेकडील ब्राह्मण सभेजवळ कल्याण-डोंबिवली महानगरपालिका शाळेच्या बंद इमारतीत दारूच्या बाटल्यांचा खच, सिगारेटची पाकिटे आढळून आल्याने मनसे पदाधिकारी व मनसैनिक संतापले. या ठिकाणी सायंकाळी गर्दुल्ल्यांचा वावर असल्याने परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत.

ही धोकादायक इमारत तोडून त्याजागी मराठी शाळेची नवीन इमारत बांधावी, अशी मागणी मनसेने पालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांच्याकडे केली आहे.

स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर मनसेचे माजी नगरसेवक मनोज घरत, उप शहराध्यक्ष दिपक शिंदे, विभाग अध्यक्ष रविंद्र गरुड यांनी शाळेच्या धोकादायक इमारतीची पाहणी केली. बंद शाळेतील तळमजल्यावर सिगारेटची असंख्य पाकिटे, दारुच्या बाटल्यांचा खच आढळून आला. मोठ्या प्रमाणावर संध्याकाळ नंतर येथे गर्दुल्ले नशा करणारी मंडळी येतात असे स्थानिकांनी सांगितले. दुर्दैवाने तरुण-तरुणींचाही वावर रात्री येथे असल्याची माहिती मिळाली.

मनसेचे माजी नगरसेवक मनोज घरत यांनी जागेची पाहणी करुन संबंधित विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांच्याशी संपर्क साधला. परंतु त्यांना याबाबत काहीही माहिती नसल्याचे आढळून आले. सदर गोष्टीची तत्काळ दखल घेऊन सुरक्षारक्षक नेमावा व लवकरात लवकर शाळा इमारत पाडून नविन सुसज्ज मराठी शाळा बांधावी यासाठी मनसे पाठपुरावा करणार असल्याचे मनोज घरत यांनी सांगितले.