कझाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये ठाणेकर बॅडमिंटनपटुंना रौप्य पदक

ठाणे: कझाकिस्तान येथे झालेल्या अपेक्स कझाकिस्तान ओपन फ्युचर सिरीज या स्पर्धेत ठाणेकर बॅडमिंटनपटू अभ्युदय चौधरी आणि झॅको सेयी या जोडीने पुरुष दुहेरीत रौप्यपदक पटकावले आहे.

गेली अनेक वर्ष अगदी लहानपणापासून ठाणे बॅडमिंटन अकॅडमीमध्ये बॅडमिंटनचे धडे गिरवणारा आणि मूळचा राजस्थानचा असणारा अभ्युदय चौधरी यांनी याआधी देखील अनेक स्पर्धांमध्ये आपल्या खेळाने सर्वांची मने जिंकली आहेत. तसेच नागालँड येथून असलेला झॅको सेयी हा देखील उत्तम कामगिरी करत आहे.

पहिल्या सामन्यापासून वरचढ ठरत असलेले हे ठाणेकर बॅडमिंटनपटू यांचा सामना उप-उपांत्य फेरीत अब्दुरसूल आणि बिलोलीदिन या जोडीशी झाला, त्यांना अभ्युदय आणि झाकोने 21-17, 21-16 अशी मात दिली. तर उपांत्य फेरीच्या सामन्यात आपल्या आक्रमक खेळीने त्यांनी जांगिर व इलिया या जोडीचा २१-१६,२१-८ असा पराभव करीत अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामन्यात त्यांना फिलिपाईन्सच्या सॉलोमन आणि ज्युलियस या जोडिकडून अतिशय अटीतटीच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला.

ठाणे बॅडमिंटन अकॅडमीमध्ये आपल्यावर घेत असलेल्या मेहनतीचा तसेच दुहेरीसाठी खास अद्ययावत डेव्हलप करण्यात आलेल्या ट्रेनिंग शेड्युलचा या आपल्या विजयात सिंहाचा वाटा असल्याचे या दोन्ही बॅडमिंटनपटूंनी नमूद केले.
या विजयाबद्दल ज्येष्ठ प्रशिक्षक व ठाणे शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत वाड, अक्षय देवलकर आणि मयूर घाटणेकर, तसेच क्रीडा अधिकारी मिनल पालांडे आणि ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या संपूर्ण टीमने अभ्युदय आणि झॅको यांना शुभेच्छा दिल्या आहेत.