ठाणे : ठाणे महापालिकेचे उपायुक्त मनीष जोशी यांच्याकडून सचिव तसेच आरोग्य विभाग अशा दोन महत्वाच्या विभागांचा कार्यभार काढण्यात आला आहे. या दोन महत्वाच्या विभागांचा कार्यभार हा शासनाकडून ठाणे महापालिकेत उपायुक्तपदी रुजू झालेल्या उमेश बिरारी यांच्याकडे देण्यात आला आहे.
श्री.बिरारी यांच्याकडे सचिव पद आणि आरोग्य विभाग याबरोबरच त्यांच्याकडे जनसंपर्क विभागही सोपवण्यात आला आहे. त्यामुळे श्री.जोशी यांच्याकडे केवळ स्थावर मालमत्ता आणि एलबीटी हे दोनच विभाग ठेवण्यात आले आहेत.
ठाणे महापालिकेची सूत्रे सांभाळल्यापासून पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सुरुवातीपासूनच प्रशासकीय शिस्तीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे पालिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्याकडून काहीही चूक झाल्यास तत्काळ त्या अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली जाते. प्रत्येक विभागाचा कारभार हा समाधानकारक झाला पाहिजे, असा आयुक्तांचा दृष्टिकोन असल्याने पालिकेचे अधिकारीही चांगलेच कामाला लागले आहेत.
ठाणे महापालिकेत उपायुक्त असलेल्या मनीष जोशी यांच्याकडे यापूर्वी आरोग्य आणि सचिव विभागासोबतच घनकचरा हा महत्वाचा विभाग देखील होता. मात्र पालिका आयुक्तांनी त्यांच्याकडून हा विभाग काढून तो नवी मुंबई पालिकेतून आलेल्या तुषार पवार यांच्याकडे यापूर्वीच सोपवला आहे. तर आता त्यांच्याकडील आरोग्य तसेच सचिव विभागही काढण्यात आला असून तो नव्याने पालिकेत रुजू झालेल्या उमेश बिरारी यांच्याकडे देण्यात आला आहे. जोशी यांच्याकडे आरोग्य विभाग असताना ते अनेक योजनांवर काम करत होते. एखाद्या विभागाचे काम समाधानकारक नसले कि त्यावर आयुक्तांकडून तत्काळ कारवाई केली जाते. जोशींकडून असे दोन महत्वाचे विभाग काढण्यात आल्याने या विभागांबाबत आयुक्त समाधानी नव्हते का? अशी चर्चा पालिका वर्तुळात सुरु आहे.