कल्याण : मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. काहींना महायुतीतील शिवसेना आणि भाजपकडून एबी फार्म देण्यात आले आहेत परंतु जागावाटपाची अधिकृत घोषणा करायला आजही मुहूर्त मिळालेला नाही, यामुळे इच्छुकांमध्ये संभ्रम आहे. जागावाटपाचे गुपित उघड होत नसल्याने युतीमधील तणाव वाढत चालला आहे.
कल्याण पूर्वेत भाजपने नऊ जागांसाठी आणि शिवसेना शिंदे गटाने १६ उमेदवार जाहीर केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे काही उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे तर काही इच्छुकांना एबी फॉर्म न मिळाल्याने नाराजीचा सूर उमटला आहे. असे असले तरी अद्याप कल्याण पश्चिम आणि डोंबिवलीचे चित्र अस्पष्टच आहे. महायुतीने जागावाटपाबाबत निर्णय घेण्यासाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपने एक समिती स्थापन केली होती. भाजपकडून ८३ जागांची मागणी करण्यात आली. मात्र भाजपच्या वाट्याला ५८ तर शिवसेना शिंदे गट ६४ जागांवर लढेल, असे ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली. उमेदवारीची अधिकृत घोषणा होत नसल्याने इच्छुकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.