अनधिकृत गोडाऊनची ‘शीळ’ दिव्याच्या विकासाला खीळ

ठामपाच्या तिजोरीला फटका-अर्चना पाटील

​ठाणे: ठाणे महानगरपालिका क्षेत्रात, विशेषतः दिवा-शीळ रस्ता, भारत गिअर ते पोलीस स्टेशन आणि दिवा ब्रिज ते शिळफाटा या परिसरात गेल्या काही वर्षांत अनधिकृत गोडाऊनचे पेव फुटले आहे. २०२२ ते २०२६ या प्रशासकीय राजवटीच्या काळात या अनधिकृत बांधकामांमध्ये प्रचंड वाढ झाली असून, यामुळे शहराच्या नियोजनबद्ध विकासाला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. शिवसेना नगरसेविका अर्चना पाटील यांनी या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

​दिवा प्रभागात हजारोंच्या संख्येने पत्र्याचे मोठी गोडाऊन उभी राहिली आहेत. ही बांधकामे करताना महानगरपालिकेची कोणतीही अधिकृत परवानगी घेतली नसल्यामुळे पालिकेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ शकते. या गोडाऊनमधून कोणत्या प्रकारचे व्यवसाय चालतात, याची कोणतीही नोंद प्रशासनाकडे नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यांना व्यावसायिक ‘मालमत्ता कर’ भरावा लागतो का याची माहिती पालिका प्रशासनाने अद्याप संबंधित लोकप्रतिनिधींना दिलेली नाही. यामुळे महानगरपालिकेच्या तिजोरीवर मोठा दरोडा पडत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. उत्पन्नाचा हा मोठा स्रोत अनधिकृत धंद्यांमुळे आटला आहे.

​ नियोजनशून्य पद्धतीने बांधलेली ही गोडाऊन आगीच्या घटनांना निमंत्रण देत आहेत. अरुंद रस्ते आणि दाटीवाटीने झालेली ही बांधकामे यामुळे आगीसारखी दुर्घटना घडल्यास अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचणे कठीण होते. हे गोडाऊन शहराच्या सौंदर्याला बाधा आणत आहे. जर या अनधिकृत बांधकामांवर वेळीच कारवाई झाली नाही, तर शहराच्या स्वच्छतेच्या क्रमवारीत पुन्हा घसरण होण्याची भीती नगरसेवक बाबाजी पाटील यांनी याआधीच व्यक्त केली आहे.

अर्चना पाटील यांनी १६ मार्च २०२६ रोजी या संदर्भात सहाय्यक आयुक्तांना पत्र दिले होते मात्र त्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. ​शहराच्या शाश्वत विकासासाठी ही अनधिकृत गोडाऊन जमीनदोस्त करणे आवश्यक आहे.

या ठिकाणी व्यवसाय करणारे स्थानिक नसून बहुतांश हे बाहेरून आलेले आहेत. त्यात बांगलादेशीही असू शकतात. शहराच्या भविष्यासाठी ही गंभीर बाब असून तत्काळ अनधिकृत व बेकायदा गोडाऊनबाबत पालिका आयुक्तांनी सहाय्यक आयुक्तांना निर्देश द्यावेत, अशी मागणी अर्चना पाटील यांनी केली आहे.

नगरसेविका अर्चना पाटील यांनी जे पत्र दिले आहे त्याबाबत आम्ही संपूर्ण कारवाईबाबतचा अहवाल त्यांना देणार आहोत. गोडाऊनबाबत आम्ही परवानगी देत नाही. असे गोडाऊन आढळल्यास आम्हाला संपर्क साधा, आम्ही कारवाई करू, असे दिवा प्रभागाचे सहायक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे यांनी सांगितले.