भाईंदर: मीरा-भाईंदर महापालिका मुख्यालयात अग्निशमन वाहनांसह जवान धावपळ करीत घुसल्याने पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. आग लागल्याचा धक्कादायक दावा करणारे विडिओ गुरुवारी समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल झाले आणि नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही आग लागलेली नसून हा संपूर्ण प्रकार अग्निशमन दलाच्या मॉक ड्रिलचा भाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.
काही दिवसांपूर्वी शहरातील मोकळ्या भूखंडावरील गोदामाला लागलेल्या भीषण आगीत जवळील इमारतींनाही फटका बसला होता. त्या घटनेनंतर शहरातील अग्निशमन यंत्रणेची कार्यक्षमता आणि आपत्कालीन प्रतिसाद यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने सज्जता तपासण्याचा निर्णय घेतला.
महापालिका आयुक्त दिलेल्या सूचनेनुसार गुरुवारी मुख्यालयात अचानक ‘आग लागल्याचा’ बनाव रचण्यात आला. या मॉक ड्रिलची पूर्वकल्पना नसल्यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये काही काळ गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र प्रशिक्षित अग्निशमन कर्मचाऱ्यांनी तत्काळ प्रतिसाद देत बचावकार्य सुरू केले. या सरावात नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणे, आगीवर नियंत्रण मिळवणे, तसे आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाच्या खबरदारीच्या उपाययोजनांचा समावेश होता.
काही वेळातच हा सराव असल्याचे स्पष्ट झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आली. दरम्यान, महापालिका इमारतीबाहेर उभ्या असलेल्या नागरिकांना आतून बाहेर पडणाऱ्या लोकांची गर्दी दिसल्याने प्रत्यक्षात आग लागल्याचा समज झाला. याच गैरसमजातून काहींनी व्हिडिओ शूट करून समाजमाध्यमांवर शेअर केले. परिणामी ‘महापालिका मुख्यालयाला आग’ अशी बातमी वाऱ्यासारखी पसरली.
या प्रकरणी अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांनी स्पष्ट केले की,’ ही केवळ अग्निशमन दलाची मॉक ड्रिल होती. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. ‘घटनेमुळे काही काळ खळबळ उडाली असली, तरी या सरावामुळे आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी यंत्रणा कितपत सज्ज आहे, याचा महत्त्वपूर्ण आढावा घेता आला, अशी प्रतिक्रिया प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.