ठाणे: राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या सुचनेनुसार ठाणे महानगर पालिकेच्या विरोधी पक्ष नेतेपदी अश्रफ (शानू) पठाण यांची नियुक्ती करण्यात आली.
ठाणे महानगरपालिकेची आज सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत विरोधी पक्षनेतेपदी शानू पठाण यांची नियुक्ती करीत असल्याचे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी जाहीर केले. त्यानंतर मनोज प्रधान आणि राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत विरोधी पक्षनेत्यांच्या दालनात प्रवेश करण्यात आला.
या शहरात पाणी, रस्ते, साफसफाई हे मूलभूत प्रश्न जैसे थे आहेत. या प्रश्नांसाठी आपण लढणार आहोतच; शिवाय, शिक्षणाच्या विषयावरही सत्ताधाऱ्यांशी आमचा संघर्ष असणार आहे. सत्ताधाऱ्यांकडून चांगली कामे झाली तर आम्ही त्याचे कौतूक करूच; पण, ते जनतेच्या हिताला बाधा आणत असतील तर आम्ही ते सहन करणार नाही, असे शानू पठाण यांनी स्पष्ट केले.