इस्रोच्या शैक्षणिक सहलीसाठी स्वधा हरमळकर व दुर्गा दिनकर यांची निवड
शहापूर : शहापूर तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी कामगिरी करत दोन विद्यार्थिनींची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आयोजित शैक्षणिक सहलीसाठी निवड झाली आहे. राज्यस्तरीय भारत टॅलेंट सर्च परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केल्याने या विद्यार्थिनींना देशातील अग्रगण्य अंतराळ संशोधन संस्थेच्या कार्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.
आसनगाव येथील एन.जे. बेलवले पब्लिक स्कूलमधील इयत्ता सहावीची विद्यार्थिनी स्वधा हरमळकर तसेच अस्नोली येथील जिल्हा परिषद शाळेची इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी दुर्गा दिनकर यांनी भारत टॅलेंट सर्च परीक्षेत उत्कृष्ट यश मिळवत इस्रोच्या शैक्षणिक सहलीत स्थान मिळवले आहे. या यशामुळे शहापूर तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांमधील बौद्धिक क्षमता, वैज्ञानिक दृष्टिकोन, तर्कशक्ती आणि सर्वांगीण गुणवत्तेचा शोध घेण्यासाठी भारत टॅलेंट सर्च परीक्षा आयोजित करण्यात येते.
देशभरातील हजारो विद्यार्थ्यांमधून निवड होणे ही मोठी उपलब्धी मानली जाते. स्वधा आणि दुर्गा यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या बळावर ही मानाची संधी प्राप्त केली आहे. इस्रोच्या शैक्षणिक सहलीदरम्यान विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन केंद्रांना भेट देण्याबरोबरच उपग्रह निर्मिती, रॉकेट प्रक्षेपण तंत्रज्ञान, वैज्ञानिक संशोधन प्रक्रिया आणि भारताच्या विविध अंतराळ मोहिमांची सविस्तर माहिती मिळणार आहे. विज्ञान व संशोधन क्षेत्राविषयी विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी आणि त्यांना भविष्यात वैज्ञानिक क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणा मिळावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल दोन्ही विद्यार्थिनींचे पालक, शिक्षक, मुख्याध्यापक आणि शालेय व्यवस्थापन यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.