ठाणे: शाळेचा अमृत महोत्सव म्हटलं की मोठे मंच, मान्यवरांची भाषणे आणि औपचारिक कार्यक्रम डोळ्यासमोर उभे राहतात. मात्र सरस्वती प्राथमिक शाळेच्या अमृत महोत्सवात काहीसे वेगळे घडले. ना कोणता सेलिब्रेटी, ना मोठा सोहळा, ना भाषणांचा भडिमार… तब्बल ७५ वर्षांनंतर पुन्हा एकदा प्राथमिक शाळेचा वर्ग भरला आणि उपस्थित प्रत्येक जण क्षणभरासाठी आपल्या बालपणात हरवून गेला.
६ जून १९५२ रोजी उमा निळकंठ व्यायामशाळेत सुरू झालेल्या सरस्वती प्राथमिक शाळेने ७५ वर्षांचा प्रवास पूर्ण केला. याच ऐतिहासिक जागेत ६ जून २०२६ रोजी पुन्हा एकदा वर्ग भरविण्यात आला. शाळेची घंटा वाजली, प्रार्थना सुरू झाली आणि वातावरणात बालपणाच्या आठवणी दरवळू लागल्या.
वर्गात आलेल्या ‘बाई’नी शांता शेळके यांची “बघ आई, आकाशात सूर्य हा आला…” ही कविता शिकवली. कविता समजावून सांगितली आणि विद्यार्थ्यांप्रमाणेच माजी विद्यार्थ्यांकडूनही वदवून घेतली. त्यानंतर ११ ते २० चे पाढे सुरू झाले. अनेक दशकांनंतरही सर्वांनी एका सुरात आणि एका दमात पाढे म्हणून दाखवत जुन्या आठवणी जाग्या केल्या. माजी विद्यार्थिनी सुमिता दिघे यांनी शिक्षिकेची भूमिका इतक्या सहजतेने साकारली की उपस्थितांना खऱ्या वर्गात बसल्याचा अनुभव आला.
ऑफ पिरेडमध्ये मात्र आठवणींचीच मैफल रंगली. शाळेच्या पहिल्या दिवसाच्या साक्षीदार असलेल्या सुरेखा शुक्ल, अलका काळे, विनय जोशी, विनय गोखले आणि राम आपटे यांनी त्या काळातील शाळा, शिक्षक, मित्रमैत्रिणी आणि बालपणातील खोडकर प्रसंग सांगत सर्वांना भूतकाळात नेले. अनेकांच्या डोळ्यांत आठवणींचे पाणी तरळले, तर चेहऱ्यावर नकळत हसूही उमटले.
सरस्वती वंदन, कर्वे बाईंनी रचलेले गीत आणि प्रसंगरूप गीतांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला आणखी भावनिक रंग चढला. शाळेच्या पहिल्या विद्यार्थिनी सुरेखा शुक्ल आणि अलका काळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला, तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.
हा कार्यक्रम केवळ अमृत महोत्सवाचा भाग नव्हता, तर शाळा म्हणजे फक्त इमारत नसून आठवणी, संस्कार, मैत्री आणि आयुष्यभर जपला जाणारा भावनिक ठेवा असतो, याची जाणीव करून देणारा होता.
७५ वर्षांनंतर भरलेल्या त्या वर्गात बाके तीच नव्हती, विद्यार्थीही तेच नव्हते; पण प्रार्थनेतील निरागसता, पाढ्यांमधील ताल आणि शाळेविषयीची ओढ मात्र तशीच होती. म्हणूनच हा वर्ग संपला, तरी उपस्थितांच्या मनात बालपणाची शाळा पुन्हा एकदा कायमची भरून राहिली.