ज्येष्ठ व्हायोलिनवादक डॉ. एन. राजम यांना पद्मविभूषण

ठाण्याच्या सांगीतिक परंपरेचा गौरव

ठाणे: भारतीय शास्त्रीय संगीताच्या विश्वात व्हायोलिनला गायकी अंगाची अभिजात ओळख मिळवून देणाऱ्या आणि ठाणेकर असलेल्या ज्येष्ठ व्हायोलिनवादक डॉ. एन. राजम यांना भारत सरकारतर्फे पद्मविभूषण हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा नागरी सन्मान जाहीर झाला आहे.

दशकानुदशके आपल्या साधनेतून कर्नाटकी आणि हिंदुस्थानी संगीताच्या परंपरांना एकसूत्रात बांधणाऱ्या डॉ. राजम यांच्या या गौरवाने केवळ ठाणेच नव्हे, तर संपूर्ण संगीतविश्वात आनंदाची लाट पसरली आहे. शिस्तबद्ध गुरुकुल परंपरा, गायकी अंगाचे व्हायोलिन वादन आणि जागतिक पातळीवर भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रसार ही त्यांच्या प्रदीर्घ संगीतसाधनेची ठळक वैशिष्ट्ये ठरली आहेत.

डॉ. एन. राजम यांचा जन्म ७ नोव्हेंबर १९३८ रोजी एर्नाकुलम (केरळ) येथे झाला. त्यांचे वडील आचार्य एन. नारायण अय्यर हे स्वतः कर्नाटकी संगीताचे प्रख्यात गायक, व्हायोलिनवादक आणि गुरू होते. अत्यंत शिस्तबद्ध आणि सांगीतिक वातावरणात राजम यांचे बालपण गेले. लहान वयातच त्यांनी संगीताची गोडी अनुभवली. डॉ. एन. राजम यांनी अतिशय लहान वयात व्हायोलिन वादनाचे औपचारिक शिक्षण सुरू केले. वडिलांकडून मिळालेल्या गुरुकुल परंपरेतील शिक्षणामुळे त्यांची संगीताची पायाभरणी अत्यंत भक्कम झाली. त्यांनी व्हायोलिन वादनात ‘गायकी अंग’ ही शैली विकसित केली, जी पुढे त्यांच्या संगीताची ओळख बनली.

प्रसिद्ध व्हायोलिन वादक पद्मभूषण पी. एन. कृष्णन हे त्यांचे थोरले बंधू आहेत. राजम यांनी मुसिरी सुब्रमण्यम अय्यर यांच्याकडून कर्नाटक संगीताचे मार्गदर्शन घेतले. त्यानंतर त्यांच्या सांगीतिक जीवनाला एक वेगळीच कलाटणी मिळाली. त्यानंतर संगीतातील दिग्गज गायक पं. ओंकारनाथ ठाकूर यांच्या संपर्कात आल्याने त्यांच्या वादनाला वेगळीच झालेली मिळाली. वडिलांकडून व्हायोलिन वादनातल्या गायकी अंगाचा गुरुमंत्र त्यांना अगोदरच मिळाला होता. पण गुरु ओंकारनाथांच्या सहवासात त्यांच्या वादनाला एक आगळीच खोली आणि तेज प्राप्त झालं. त्यांची कीर्ती ही फक्त देशातच राहिली नव्हती तर ती विदेशातही पसरत होती. त्यांनी अमेरिका, युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया अशा विविध देशांत यशस्वी संगीत मैफिली सादर केल्या. भारतीय शास्त्रीय संगीताचा जागतिक प्रसार करण्यात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे.

व्हायोलीन हे वाद्य १७ व्या शतकात युरोपातील इटली, जर्मनी आणि इंग्लंड या देशात अवतरलं. भारतात ते पाश्चात्यांमुळे आले. अभिजात संगीताच्या दरबारात १८ व्या शतकात भालुस्वामी दीक्षितार यांच्यामुळे ते प्रस्थापित झालं. पुढे हिंदुस्थानी संगीतातही उस्ताद अल्लाउद्दिन खान यांच्यामुळे व्हायोलिन हे वाद्य रुळू लागलं. आधी संगीत साथीचे वाद्य म्हणून पुढे स्वतंत्र एकल वाद्य म्हणून. राजम यांचं खास वैशिष्ट्य म्हणजे गायकी अंगाचं व्हायोलिन वादन लोकप्रिय करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. राग गायनात मेंड, गमक, कंपन, मुर्की, झलकतान वगैरे कंठ संगीताचे अविष्कार त्यांना येतात. त्यांच्या व्हायोलिन वादनातून हे सर्व ठळकपणे प्रतीत होतात. त्या जेव्हा गुरु ओंकारनाथांची मत जा जोगी ही भैरवी वाजवतात तेव्हा जणू मीराबाईंचे शब्द सजीव होतात.

आजवर त्यांनी अनेक शिष्य घडवले आहेत. त्यांनी त्यांच्या कन्या आणि नातीसह तीन पिढ्यांचा एकाच मंचावरून होणारा संगीत अविष्कार हा रसिकांसाठी एक अभूतपूर्व योग्य असतो. त्यांचा भारत सरकारतर्फे पद्मश्री (१९८४), पद्मभूषण (२००४) पुरस्कार मिळाला असून आता पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. तीन पद्म पुरस्कार मिळवण्याचा सन्मान या आधी अमिताभ बच्चन आणि सत्यजित रे यांना मिळाला आहे. त्यांना संगीत नाटक अकादमीतर्फे पुरस्कार, तसेच संगीत क्षेत्रातल्या पंडित बिस्मिल्ला खान, पंडित भीमसेन जोशी, भूपेन हजारिका, उस्ताद झाकीर हुसेन, येसुदास यांच्या नावाने दिले जाणारे पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्र शासनातर्फे डॉ. एन. राजम यांना शास्त्रीय संगीत क्षेत्रातल्या योगदानासाठी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

‘ठाणेवैभव’च्या प्रतिनिधींनी पद्मविभूषण डॉ.राजम यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, मला १९८४ मध्ये पद्मश्री तर २००४ मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला. आता २०२६ मध्ये पद्म विभूषण पुरस्कार मिळाला असून हे सारे देवाच्या आशीर्वादामुळे झाले आहे. माझे वडील श्री. ए. नारायण अय्यर यांनी मी तीन वर्षांची होते तेव्हा मला व्हायोलीन घेऊन दिले तसेच व्हायोलिन वादन शिकवले. तेव्हापासून आजतागायत मी संगीत सेवा करत आहे. माझे वडील तसेच कर्नाटक संगीत क्षेत्रातील विद्वान श्री. सुब्रमण्यम अय्यर, हिंदुस्तानी संगीत क्षेत्रातील पंडित ओंकारनाथ ठाकुर हे माझे गुरु असून त्यांना मी हा पुरस्कार समर्पित करते, अशा भावना डॉ. राजम यांनी व्यक्त केल्या.