बंडखोरांना काढणार रांगेबाहेर
ठाणे: ठाणे महापालिकेत सर्वाधिक सदस्य असलेला शिवसेना शिंदे गट आणि त्याखालोखाल भाजपला तिकीट वाटपानंतर आता स्विकृत सदस्यपद वाटपाची अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. तिकीट न मिळालेले आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांची संख्या मोठी असल्याने संधी कोणाला द्यायची, असा गहन प्रश्न स्थानिक नेत्यांना पडला आहे.
ठाणे महापालिकेत एकहाती सत्ता असलेल्या शिवसेना शिंदे गटाचाच शिलेदार महापौर होणार हे स्पष्ट झाले आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या विशेष महासभेत महापौर होण्याची शक्यता आहे. यावेळी १३१ नगरसेवक सभागृहात पाऊल ठेवणार आहेत. त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ आणखी १० स्वीकृत नगरसेवकही सभागृहात येणार आहेत. पण त्यासाठी आतापासूनच इच्छूकांनी पक्ष श्रेष्ठींकडे आणि स्थानिक नेतृत्वाकडे मनधरणी करण्यास सुरुवात केली आहे. गेली अनेक वर्षे निष्ठेने प्रभागात काम करत असलेल्या अनेक महिला पदाधिकारीही प्रयत्न करत आहेत. मात्र या गर्दीतून उमेदवारी अर्ज मागे घेऊन श्रेष्ठींच्या सूचनेला मान देणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या दोन शिलेदारांची नावे स्वीकृतसाठी निश्चित झाली असल्याचे समजते.
बंडखोरी करणारे आणि पराभूत उमेदवारांना स्वीकृतसाठी संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाच्या विश्वसनीय सुत्राने दिली. त्यामुळे बंडखोरी करणार्या डझनभर इच्छुकांचा हिरमोड होणार आहे. दुसरीकडे भाजप आणि इतर पक्षातही स्वीकृतसाठी अर्ज, विनंत्या येऊ लागल्या आहेत.
ठाणे महापालिकेमध्ये १३१ नगरसेवक निवडून आले आहेत. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे ७५ अधिक एक अपक्ष असे ७६ नगरसेवकांचे बलाबल आहे. भाजपचे २८, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ११, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ८, एमआयएमचे ५ आणि ठाकरे गटाचा एक असे पक्षीय बलाबल आहे.
१३ नगरसेवकांच्या मागे एक स्वीकृत असे गणित आहे. यानुसार शिवसेना शिंदे गटाकडे ७६ नगरसेवक असल्याने त्यांचे सहा स्वीकृत नगरसेवक असतील. भाजपच्या वाट्याला दोन स्वीकृत नगरसेवक येतील. दोन्ही राष्ट्रवादी आणि एमआयएमकडे तुलनात्मक संख्या कमी असली तरी प्रत्येकी एक असे तीन स्वीकृत पदे त्यांच्या पदरात पडण्याची शक्यता आहे.