रस्त्यावर थुंकल्याचा जाब विचारल्याने ज्येष्ठाला मारहाण

परप्रांतीय ओला चालकाला दोन्ही शिवसेना कार्यकर्त्यांकडून चोप

ठाणे : रस्त्यावर का थुंकला असा जाब विचारणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला बेदम मारहाण करणाऱ्या ओला चालकाच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत असून त्याच्या विरोधात ३०७कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे पोलिसांना दिले आहे. या चालकाचा शोध घेत दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला आहे.

ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयाजवळ रस्त्यावर थुंकणाऱ्या एका परप्रांतीय चालकाला स्थानिक वृद्ध व्यक्तीने जाब विचारला होता. याचा राग आल्याने चालक वाहनातून खाली उतरला, त्यांच्यात बाचबाची झाली आणि त्याने वृद्धाला बेदम मारहाण केली. मारहाणीदरम्यान त्या परप्रांतीय चालकाने हातात दगड घेतल्याचेही व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

या हल्ल्यात वृद्ध गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पायाला गंभीर इजा झाली आहे. नागरिकांनी केलेल्या हस्तक्षेपामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली. शिंदे आणि ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ओला चालकाला शोधून काढले आणि त्याला चांगलाच चोप देऊन वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात दिले.

या घटनेची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समजताच त्यांनी स्वतः हस्तक्षेप करत ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना फोन करून त्या चालकावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०७ अन्वये हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले.

या मारहाणीच्या घटनेमुळे परप्रांतीय ओला चालकाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता मनसेच्या कार्यकर्त्यांनी देखील या घटनेची गंभीर दखल घेऊन ज्युपिटर आणि कापुरबावाडी परिसरात उभ्या असलेल्या ओला-उबेर चालकांना मारहाण करण्यात आली तर उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या आदेशानुसार पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकाला मारहाण झाली त्या परिसराची पाहणी केली.

बेशिस्तीला लगाम कोण घालणार?

बाजारपेठा असोत की रस्ते, उघड्यावर थुंकणाऱ्या नागरिकांच्या बेशिस्तीला लगाम कोण घालणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १०० रुपये दंडाची किरकोळ तरतूद करण्यात आली आहे. मात्र अशी कारवाई होताना कुठे दिसत नाही. आपण ज्या शहरात राहतो, त्या शहरावर प्रेम करावे, त्याच्या विकासात आणि सौंदर्यात योगदान द्यावे, हे नागरीकांचे कर्तव्य ठरते. ही जाणीव निर्माण करण्यासाठी ‘ठाणेवैभव’ने ‘एक मिनिट ठाण्यासाठी’ ही संकल्पना मांडली आणि रुजवली. ही संकल्पना फोफावण्यासाठी पालिका आणि पोलीस प्रशासनाने आता गांभीर्याने घ्यायला हवे.