नवी मुंबईचे मेट्रो जाळे विस्तारणार

* मेट्रो १ ए आणि २ प्रकल्पाला मंजुरी
* ५५७५ कोटींची तरतूद

नवी मुंबई : नवी मुंबईच्या वाहतूक पायाभूत सुविधांना मोठी चालना देणारा निर्णय घेत महाराष्ट्र शासनाने सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो नेटवर्क विस्ताराच्या महत्त्वाकांक्षी प्रस्तावास मंजुरी दिली आहे. या अंतर्गत नवी मुंबई मेट्रो लाईन 1 ए आणि लाईन 2 विकसित करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत या प्रकल्पास मान्यता देण्यात आली.

मुंबई महानगर प्रदेशासाठी (एमएमआर) तयार करण्यात आलेल्या सर्वसमावेशक वाहतूक अभ्यास अहवालांतर्गत प्रस्तावित मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टिमचा हा महत्त्वाचा भाग आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये नवी मुंबई मेट्रो लाईन १ यशस्वीरित्या सुरू झाल्यानंतर सिडकोने मेट्रो विस्ताराच्या पुढील टप्प्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून तो महाराष्ट्र शासनाकडे सादर केला होता.

प्रस्तावित मेट्रो लाईन १ ए हा ३.०२ कि.मी. लांबीचा उन्नत मार्ग असून तो सीबीडी बेलापूर ते सागर संगम या दरम्यान दोन स्थानकांसह विकसित करण्यात येणार आहे. या मार्गाला प्रस्तावित गोल्ड लाईन (मेट्रो लाईन ८) शी आंतरजोडणी देण्यात येणार असून, त्यामुळे नवी मुंबईच्या पश्चिम भागातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत अखंड आणि सुलभ प्रवास शक्य होणार आहे.

तसेच १४.०७ कि.मी. लांबीची मेट्रो लाईन २ ही पेंधर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल-४ दरम्यान ११ स्थानकांसह विकसित करण्यात येणार आहे. हा मार्ग विमानतळ परिसरातील वेगाने विकसित होत असलेल्या क्षेत्रांना तसेच एमआयडीसी भागाला महत्त्वपूर्ण सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देईल. याशिवाय, एमएमआरडीएतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या कल्याण-तळोजा मेट्रो लाईन १२शी तळोजा येथील अमनदूत स्थानकावर आंतरजोडणी प्रस्तावित असून, त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशाच्या पूर्वेकडील भागांनाही या मेट्रो नेटवर्कचा लाभ मिळणार आहे.

कार्यक्षमता वाढविणे आणि प्रवाशांना अखंड प्रवासाचा अनुभव देणे या उद्देशाने मेट्रो लाईन १ ए आणि लाईन २ यांचे विद्यमान ११ कि.मी. लांबीच्या नवी मुंबई मेट्रो लाईन १ सोबत एकत्रीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे सागर संगम ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा सुमारे २८ कि.मी. लांबीचा सलग आणि एकात्मिक मेट्रो मार्ग तयार होणार आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाचे महत्त्व अधिक वाढले आहे. या एकात्मिक मेट्रो मार्गामुळे संपूर्ण नवी मुंबईला प्रभावी मेट्रो सुविधा उपलब्ध होणार असून, कल्याण, तळोजा आणि आसपासच्या भागांतील नागरिकांनाही विमानतळापर्यंत सुलभ व जलद संपर्क मिळणार आहे.

सुमारे ५५७५ कोटी खर्चाच्या या प्रकल्पाचे बांधकाम आर्थिक वर्ष २०२७-२८ मध्ये सुरू होण्याची अपेक्षा असून, आर्थिक वर्ष २०३१-३२ पर्यंत प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्याचे नियोजन आहे.