ठाणे: इमारतीच्या सुरक्षेची जबादारी असलेल्या सुरक्षा रक्षकानेच चोरीच्या उद्देशाने ज्येष्ठ दाम्पत्याची हत्या केल्याचा गुन्हा चितळसर-मानपाडा पोलिसांनी एका महिन्यानंतर उघडकीस आणून दोन आरोपीना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून चोरीचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
निसार शेख (२७) आणि रोहित उत्तेकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. निसार हा त्याच इमारतीचा सुरक्षारक्षक आहे तर रोहित कळवा येथिल छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात वॉर्ड बॉयचे काम करतो. चितळसर-मानपाडा पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या एमएमआरडीएच्या इमारतीच्या १४व्या मजल्यावर राहणारे ६८ वर्षांचे समशेर बहादूर सिंग आणि त्यांची ६५ वर्षांची पत्नी मीना सिग यांची ४ जानेवारी २०२४ला हत्या झाली होती. त्यांचा अंबरनाथ येथे राहणारा मुलगा सुधीर सिंग हा आई-वडिलांना फोन करत होता, परंतु कोणत्याही प्रकारचा त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने तो संध्याकाळी घरी आला तेव्हा त्याचे आई-वडिल मृत्यू पावलेले आढळून आले होते. त्याने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
या हत्येचा तपास चितळसर-मानपाडा पोलिस करत होते. पोलिसांनी सीसी टीव्ही फुटेज इमारतीमधील रहिवाशांकडे चौकशी केली होती. पोलिस हवालदार अभिषेक सावंत आणि पोलिस शिपाई शैलेश भोसले हे मागील एक महिना या इमारतीमध्ये तळ ठोकून होते. अखेर रोहित उत्तेकर हा वारंवार निसार याच्या घरी जात असल्याची माहिती अभिषेक सावंत आणि शैलेश भोसले यांना मिळाली असता त्यांनी निसारला चौकशीकरिता पोलीस ठाण्यात नेले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती परिमंडळ पाचचे पोलिस आयुक्त अमरकुमार जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या आरोपींकडून मृत्यू दाम्पत्याचा मोबाईल फोन, सोन्याच्या बांगड्या, कर्णफूले आदी वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत. यावेळी उपायुक्त श्री. जाधव यांनी हवालदार अभिषेक सावंत आणि पोलिस शिपाई शैलेश भोसले यांचे खास कौतुक केले. या आरोपीना २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठाडी सुनावण्यात आली आहे.