डिसेंबरअखेर रस्ते विकासाची कामे पूर्ण करण्यासाठी हातघाई

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे एमएमआरडीएला निर्देश

मुंबई: ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सेक्टर क्र. ४, ५ व ६ या परिसरातील मंजूर विकास आराखड्यानुसार नियोजित रस्त्यांचा विकास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्यामार्फत करण्यात येत आहे. घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्त्यांची कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज येथे दिले.

मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात आयोजित बैठकीत ठाणे महापालिका क्षेत्रातील एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा घेत असताना ते बोलत होते.

यावेळी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त अश्विनकुमार मुद्गल व विक्रम कुमार यांच्यासह अभियंता व इतर अधिकारी उपस्थित होते.

मंत्री सरनाईक पुढे म्हणाले की, या प्रकल्पांतर्गत ठाणे महापालिका क्षेत्रातील घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडी लक्षात घेऊन मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या परिसरातील डी.पी. रस्ते विकसित करण्यात येणार आहेत. मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले सेवा मार्ग हे ३१ डिसेंबरअखेर मुख्य रस्त्याला जोडण्यात यावेत. तसेच मेट्रो स्थानकाचे जिने रस्त्याच्या मधोमध न उतरता ते रस्त्याच्या दोन्ही कडेला उतरण्यात यावेत, अशी सूचनाही त्यांनी केली.

हा प्रकल्प राबविल्यामुळे घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल. तसेच परिसरातील नागरिकांना पर्यायी रस्ते उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे २० रस्त्यांपैकी पाच रस्त्यांचे स्वतंत्र सर्वेक्षण सुरू असून, उर्वरित १० रस्त्यांचे नवीन विकासकाम लवकरच अंतिम करण्यात येणार आहे. ठाणे शहरातील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी एमएमआरडीए व ठाणे महापालिका प्रशासनाने एकमेकांना सहकार्य करून गतीने प्रकल्प पूर्ण करावेत, असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी केले.