तीन सुवर्ण पदकांसह आठ पदकांची कमाई
ठाणे: नांदेड येथे नुकत्याच पार पडलेल्या योनेक्स सनराईज महाराष्ट्र राज्य जुनियर बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा २०२५ मध्ये ठाणे बॅडमिंटन अकादमीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन करत एकूण आठ पदकांची कमाई केली. या पदकांमध्ये तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि दोन कांस्य पदकांचा समावेश आहे. हे सर्व खेळाडू ठाणे महापालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममधील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलमध्ये चालविण्यात येणाऱ्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेअंतर्गत गेली अनेक वर्ष प्रशिक्षण घेत आहेत.
१९ वर्षांखालील मिश्र दुहेरी गटात सर्वेश यादव याने श्रावणी वाळेकर हिच्यासोबत भाग घेत अंतिम फेरीत निधीश मोरे-प्रांजल शिंदे यांचा 21-17, 21-10 असा सरळ सेट्समध्ये पराभव करून सुवर्ण पदक पटकावले. उपांत्य फेरीत त्यांनी यशराज कदम-अनन्या अग्रवाल यांच्यावर 21-12, 21-8 असा विजय मिळवला. या गटात सनिध्य एकडे याने कांस्यपदक पटकावले.
१९ वर्षांखालील मुलांच्या दुहेरी गटात आर्यन आणि अर्जुन बिराजदार या जोडीने उत्तम खेळ करत पुन्हा एकवार सुवर्णपदक पटकावले आहे. अंतिम फेरीत त्यांनी ओम गवंडी-सनिध्य एकडे या ठाण्याच्याच जोडीचा 19-21, 21-17, 21-8 असा पराभव केला. ओम आणि सनिध्य यांनी रौप्यपदक मिळवले. याच गटात यश ढेंबरे यानेही कांस्यपदक पटकावले.
१९ वर्षांखालील मुलींच्या दुहेरी गटात आदिती गावडे हिने युतीका चव्हाण हिच्यासह खेळत उपांत्य फेरीत हित अग्रवाल-सिया वायदंडे यांना 21-6, 21-15 अशा फरकाने पराभूत करून अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
सर्व खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय सर्व प्रशिक्षकांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाला दिले आहे. या यशाबद्दल ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड यांनी खेळाडूंचे कौतुक करीत या पुढे देखील आपण अशीच अभिमानास्पद कामगिरी करत राहू असे व्यक्त केले.