विठ्ठल मूर्तीभोवती टपऱ्यांचा फेर; सेना नगरसेविकेचा घरचा आहेर

उपवन तलाव परिसरात दारू गांजाचे सेवन, चिकन शॉर्माची विक्री

ठाणे: ठाण्यातील उपवन तलाव परिसरात बेकायदा टपऱ्या, दारू- गांजाचे सेवन तसेच विठ्ठल मूर्तीसमोरच चिकन शॉर्माच्या गाड्या लावण्यात येत आहेत. महिलांसाठी असुरक्षित वातावरण निर्माण झाले असून तक्रारी केल्यानंतरही कारवाई होत नसल्याबद्दल सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेविका परिषा सरनाईक यांनी सर्वसाधारण सभेत संताप व्यक्त करत घरचा आहेर दिला.

ठाणे शहराची ओळख ही अनधिकृत ठाणे अशी होऊ लागली आहे. शहरात बेकायदा टपऱ्या आणि अनधिकृत बांधकामांचे प्रमाण वाढले आहे. उपवन तलाव हा फेरिवाल्यांचा तलाव म्हणून ओळखला जात आहे. या तलावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात टपऱ्या लागत आहेत. याच परिसरात गांजा, दारुचे सेवनही केले जात आहे. उपवन तलाव परिसरात उभारण्यात आलेल्या विठ्ठल मूर्तीच्या प्रवेशद्वारावरच हातगाड्या आणि टपऱ्या लागत आहेत. तेथे चिकन शॉर्मा विकले जात आहे. यामुळे विठ्ठल मूर्तीचे पावित्र्य धोक्यात आले असून मूर्ती स्थलांतरीत करण्याची वेळ आल्याची बाब परिषा सरनाईक यांनी बुधवारी झालेल्या ठाणे महापालिकेच्या महासभेत मांडली. उपवन तलाव परिसर ही चौपाटी नाही. या भागात गृहसंकुले आहेत. नागरिक तिथे राहतात. उपवन परिसरातील वातावरणामुळे महिलांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे, असे गंभीर आरोप परिषा सरनाईक यांनी केले.

या परिसरात पालिकेचे पथक सहा वाजेपर्यंत असते. हे पथक निघून गेले की या गाड्या लागतात, रात्री उशीरापर्यंत या गाड्या सुरू असतात. याबाबत वारंवार तक्रार करूनही कारवाई झालेली नाही. आयुक्त सौरभ राव आणि महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या दालनात बैठका होऊनही कारवाई झालेली नाही. कारवाई का होत नाही आणि कधी होणार, असा प्रश्न उपस्थित करत कारवाई करणार नसाल तर, विठ्ठलमूर्ती दुसरीकडे स्थलांतरीत करा, अशी हतबलता त्यांनी व्यक्त केली. यानिमित्ताने परिवहन मंत्र्यांच्या पत्नीनेच सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिल्याची चर्चा रंगली होती.

दरम्यान, प्रशासनाला कारवाईची वेळ वाढविण्याचे आदेश देऊनही कारवाई का केली नाही, असा जाब महापौर पिंपळोलकर यांनी प्रशासनाला विचारला. तर, रात्री १० वाजेपर्यंत कारवाई करण्यात येते. त्याचा वेळ आणखी वाढविण्यात येईल. तसेच कारवाई झाली नाहीतर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्टीकरण अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले.

घोडबंदर रोड, ठाणे शहर तसेच इतर भागातही फेरिवाल्यांची समस्या आहे. या फेरिवाल्यांवर कारवाई होत नाही. नगरसेवकांनी पालिकेत तक्रार केली तर, फेरिवाले नगरसेवकांच्या कार्यालयात भेटायला येतात. त्यांना तक्रारीबाबत माहिती कशी मिळते. तसेच कारवाईला पथक येणार असते, तेव्हाही फेरिवाले गायब होतात. त्यामुळे त्यांना कारवाईची माहिती कशी मिळते, असा प्रश्न भाजपच्या नगरसेविका अर्चना मणेरा, नम्रता कोळी आणि मृणाल पेंडसे यांनी उपस्थित केला.