रासायनिक रंगांमुळे त्वचा, डोळे आणि श्वसनविकारांचा धोका

नैसर्गिक रंगांचा वापर करण्याचे डॉक्टरांचे आवाहन

ठाणे: रंगपंचमी हा रंगांचा, आनंदाचा आणि मैत्रीचा सण असला तरी तो साजरा करताना आरोग्य आणि पर्यावरणाची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. ठाणे शहरात रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये विविध प्रकारचे रंग विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. मात्र या रंगांमध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक घटक मिसळलेले असण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पर्यावरण तज्ज्ञ आणि वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांकडून करण्यात येत आहे.

रासायनिक रंगांमध्ये शिसे, क्रोमियम, तांबे सल्फेट, ॲल्युमिनियम ब्रोमाइड यांसारखे घातक घटक असू शकतात. हे रंग त्वचेवर लावल्यास खाज, पुरळ, सूज, ॲलर्जी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. डोळ्यात रंग गेल्यास जळजळ, संसर्ग किंवा दृष्टीदोषाचा धोका संभवतो. तसेच रंगांची धूळ श्वासावाटे शरीरात गेल्यास दमा किंवा श्वसनाचे त्रास वाढू शकतात.

विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि त्वचारोग असलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी अनोळखी व्यक्तींवर जबरदस्तीने रंग टाकणे टाळावे. रंग खेळताना डोळे, नाक, तोंड यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे.

पर्यावरण अभ्यासकांनी नैसर्गिक आणि सेंद्रिय रंगांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. हळद, बीट, पालक, फुलांची पाकळी यांसारख्या नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले रंग सुरक्षित आणि पर्यावरणपूरक असतात. अशा रंगांचा वापर केल्यास त्वचेवर दुष्परिणाम होण्याची शक्यता कमी होते आणि पाण्याचे प्रदूषणही टाळता येते. तसेच रंगपंचमीदरम्यान पाण्याचा अपव्यय टाळावा, प्लॅस्टिक पिशव्या किंवा फुग्यांचा वापर करू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.

रंगपंचमी साजरी करताना रासायनिक रंगांचा वापर टाळावा. अशा रंगांमुळे त्वचा, डोळे आणि श्वसनावर दुष्परिणाम होऊ शकतात. नैसर्गिक रंगांचा वापर करा आणि कोणतीही ॲलर्जी किंवा त्रास जाणवल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी केले आहे.