नवी मुंबईत २२ ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका

सर्वाधिक धोका तुर्भे भागात

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात २२ ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका आहे. यापैकी एकट्या तुर्भे भागात नऊ क्षेत्रे धोकादायक आहेत, मात्र असे असून देखील मनपाने अद्याप दरडग्रस्त भागांची अधिकृत यादी जाहीर केलेली नसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवी मुंबई शहराच्या पूर्व दिशेला डोंगररांगा आहेत. या ठिकाणी दगड खाणी असल्याने डोंगर पुरते पोखरले गेले आहेत. त्यामुळे येथील अनेक डोंगर कमकुवत झाले आहेत. चार दिवसांपूर्वी पावणे परिसरातील माती भरण्याच्या कामादरम्यान मोठी दुर्घटना घडली. मातीचा प्रचंड ढिगारा अचानक घसरून शेजारील औद्योगिक कंपन्या आणि मुख्य रस्त्यावर कोसळल्याने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. ही घटना ताजी असतानाच नवी मुंबईतील दरडप्रवण भागांकडे विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. नवी मुंबई शहरात पावसाळी दिवसात अनेक ठिकाणी माती खचणे, भिंती कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पावसाळी दिवसात दरडप्रवण भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचा जीव टांगणीला लागेलला असतो.

दरड कोसळण्याच्या संभाव्य जागांची महानगरपालिका व एमआयडीसीच्या क्षेत्रीय अधिका-यांनी संयुक्त पहाणी करावी आणि त्या परिसरात नागरिकांचे वास्तव्य असल्यास त्यांना दरड कोसळण्याचा संभाव्य धोका लक्षात आणून देऊन त्यांचे तत्परतेने स्थलांतरण करावे असे मनपा आयुक्तांनी २२ एप्रिल २०२६ रोजी मान्सून पूर्व आढावा बैठकीत सूचित केले होते. मात्र १२ जून उजाडूनही नवी मुंबई महापालिकेच्या वतीने अद्याप दरडप्रवण क्षेत्राबाबत कोणतीही अधिकृत सूचना देण्यात आलेली नाही. तसेच संभाव्य धोकादायक ठिकाणी इशारा फलकही लावलेला नाही.

संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने अशी यादी जाहीर करून फलक लावण्याची मागणी जोर धरु लागली आहे. याबाबत मनपा आपत्ती व्यवस्थापन विभागात माहिती घेतली असता फक्त विभागवार दरडप्रवण क्षेत्रांची माहिती दिली असून तशी यादी अद्याप प्रसिद्ध केली नसल्याचे कळवले.

नवी मुंबईतील दरडप्रवण क्षेत्र

बेलापूर-३, नेरुळ-५, तुर्भे-९, घणसोली-२, दिघा-३