कल्याणमध्ये कचऱ्यात सापडली नवजात मुलगी

कल्याण : कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरातील चिकणीपाडा परिसरात कचऱ्यात सहा दिवसांची नवजात मुलगी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

परिसरात राहणाऱ्या पूजा लावेकर या शाळेत काम करतात. सकाळच्या सुमारास त्या कचरा टाकण्यासाठी गेल्या असता एका पिशवीत ही नवजात मुलगी आढळून आली. त्यावेळी काही भटके कुत्रे या बाळाच्या आसपास फिरत होते. कुत्र्यांपासून बाळाला धोका असल्याचे लक्षात येताच पूजा यांनी तातडीने मुलीला उचलून घेतले आणि पोलिसांना माहिती दिली.त्यानंतर मुलीला उपचारासाठी महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.

डॉक्टरांच्या माहितीनुसार, सध्या मुलीची प्रकृती स्थिर असून काही काळ तिला निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, नवजात मुलीला अशा अवस्थेत टाकून जाणाऱ्या व्यक्तींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.