जुन्या विहिरींचे पुनरुज्जीवन; आर.ओ. प्लांटद्वारे पाणी वितरण

लोकमान्यनगरवासींना शुद्ध पाण्यामुळे दिलासा

ठाणे : शहरातील वाढते नागरीकरण आणि त्यातून निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर प्रभावी उपाय म्हणून लोकमान्यनगर पाडा क्र. १ व २ तसेच उन्नती गार्डन परिसरातील जुन्या विहिरींचे पुनरुज्जीवन करण्यात आले असून, त्यावर आर.ओ. प्लांट उभारून नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे लोकार्पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला शिवसेना ठाणे शहरप्रमुख व नगरसेवक राजेंद्र पाठक, राकेश शिंदे, नगरसेविका शीतल धमाले, सुलेखा चव्हाण, जयश्री डेव्हिड, शिवसेना विधानसभा सचिव संदीप डोंगरे, विभागप्रमुख भगवान देवकाते, रामचंद्र गुरव, संतोष धमाले, देवेंद्र साळवी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की, ठाणे शहरातील अनेक विहिरी कालांतराने बुजविण्यात आल्या किंवा कचरा व सांडपाण्यामुळे दूषित झाल्या. परिणामी, नैसर्गिक जलस्रोत नष्ट होण्याच्या मार्गावर होते. ही बाब लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात ठाणे व मीरा-भाईंदर शहरांतील ४६ विहिरींच्या पुनरुज्जीवनासाठी सुमारे ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. या निधीतून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत विहिरींची वैज्ञानिक पद्धतीने साफसफाई, गाळ काढणे आणि संरक्षक उपाययोजना करून त्यांना पुन्हा जिवंत करण्याचे काम सुरू आहे. तसेच, या विहिरींवर आर.ओ. प्लांट बसविण्याचे कामही प्रगतीपथावर आहे. सध्या वाढत्या उन्हाळ्यामुळे महापालिकेकडून होणारा पाणीपुरवठा अपुरा पडत असताना किंवा तांत्रिक कारणांमुळे तो खंडित झाल्यास नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत पुनर्जीवित विहिरी आणि त्यावर बसविण्यात आलेले आर.ओ. प्लांट नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहेत.

या प्रकल्पांतर्गत विहिरींमधील पाण्याचे नैसर्गिक स्रोत जपले जात असून, सांडपाणी मिसळण्यास प्रतिबंध केला जात आहे. विहिरींच्या संरक्षणासाठी जाळ्या बसविणे, भिंतींचे मजबुतीकरण करणे तसेच नियमित स्वच्छता राखणे अशा उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यामुळे विहिरींतील पाणी शुद्ध आणि सुरक्षित राहणार आहे.

या उपक्रमामुळे एप्रिल-मे महिन्यांत भासणारी तीव्र पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार असून, नागरिकांना वर्षभर शुद्ध पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

४६ विहिरींपैकी १२ विहिरींचे काम पूर्ण झाले असून दर आठवड्याला तीन ते चार विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याचा मानस आहे. हा उपक्रम पुढील काळात संपूर्ण शहरात राबविण्याचा विचार असल्याचेही सरनाईक यांनी सांगितले.

नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करणारा हा विहिरींच्या पुनरुज्जीवनाचा उपक्रम आदर्श ठरत असून, राज्यातील इतर शहरांतही अशा उपक्रमांची अंमलबजावणी व्हावी, असे आवाहनही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.