आमदार संजय केळकर यांची माहिती
ठाणे: कळवा पुलाजवळील रखडलेल्या कै. उत्तमराव पाटील जैव विविधता उद्यान प्रकल्पाला गती मिळाली असून जिल्हा नियोजन, कांदळवन आणि आमदार निधीतून हा प्रकल्प मार्गी लागणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली.
भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. यावेळी आमदार निरंजन डावखरे, शेखर पाटील, कैलास म्हात्रे, दया यादव, भाजपा महिला आघाडीच्या स्वप्नाली साळवी उपस्थित होते.
कळवा पूल ते साकेत या खाडीकिनारी अतिक्रमणे आणि डम्पिंग यामुळे परिसराला अवकळा आली होती. शहरात हरित क्षेत्र वाढवणे, स्थानिक जैवविविधता जपणे, नागरिकांना निसर्गाशी जोडणे आणि विद्यार्थ्यांना पर्यावरण शिक्षण मिळावे या उद्देशाने आमदार संजय केळकर यांनी येथे जैवविविधता उद्यान प्रकल्पाची संकल्पना मांडली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी सामाजिक वनीकरणातून हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र ठाकरे सरकारच्या कार्यकाळात या प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली तसेच देखभालीसाठी देखील निधी न दिल्याने या प्रकल्पाला अवकळा आल्याचे श्री. केळकर यांनी सांगितले.
सहा महिन्यांपासून याबाबत पुन्हा हालचाली सुरू करण्यात आल्या असून वनमंत्री, प्रधान सचिव यांच्यासह तीन बैठका घेण्यात आल्या. त्यानुसार हा प्रकल्प कांदळवन विभागाकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच जिल्हा नियोजन, कांदळवन आणि आमदार निधीतून या प्रकल्पाचे काम नव्याने सुरू करण्यात येणार असल्याचे श्री. केळकर म्हणाले.
खोपट येथील एसटी आगारात ज्येष्ठ नागरीकांना सवलतीचे पास देण्यात येत आहेत. येथे एकच खिडकी असून कर्मचारीही उपलब्ध नसतो. त्यामुळे भर उन्हात ज्येष्ठांना ताटकळत उभे राहावे लागते. यामुळे शासनाच्या चांगल्या योजना अपयशी होतात, अशी भीती श्री. केळकर यांनी व्यक्त केली. येथे आणखी काही खिडक्या पुरेशा मनुष्यबळासह सुरू करण्यात याव्यात, जेणेकरून ज्येष्ठांना ताटकळत उभे राहण्याची पाळी येणार नाही, यासाठी श्री. केळकर यांनी मुख्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानुसार उद्यापासून सक्षम व्यवस्था सुरू करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे श्री. केळकर म्हणाले.
जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात सायबर फसवणूक, पुनर्विकास योजनेतील रहिवाशांची फसवणूक, मंत्रालय, महापालिका संदर्भातील तक्रारी, कमी दाबाने पाणी पुरवठा याबाबत निवेदने प्राप्त झाली. या कार्यक्रमात सोलापूर येथील नागरिकाने देखील वहिवाटीचा रस्ता अडवल्याची तक्रार केली. यावेळी श्री. केळकर यांनी संबंधित अधिकारी आणि तेथील स्थानिक आमदार यांच्याशी संपर्क साधून हा विषय मार्गी लावला.
डोंबिवलीजवळ असलेल्या पिंपळास या असंरक्षित किल्ल्यावर रायगडाच्या धर्तीवर मेघडंबरी व छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती बसविण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. केळकर यांनी दिली. सह्याद्री प्रतिष्ठानचे डोंबिवली विभागाचे गणेश मांगले, श्री. सुर्वे व कार्यकर्ते देखील यावेळी उपस्थित होते. यावेळी एका शिवभक्ताने आ. केळकर यांच्याकडे एक लाख ११ हजार रूपयांचा धनादेश पिंपळास गडावर बसविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीकरिता अर्पण केला.