ठाण्यात रिपब्लिकन सेनेचे उमेदवार निवडून आणणार – रामभाऊ तायडे

ठाणे: ठाणे महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेचे किमान सात नगरसेवक निवडून आणणार असल्याचा विश्वास माजी नगरसेवक रामभाऊ तायडे यांनी व्यक्त केला.

रामभाऊ तायडे यांनी आपला मूळ पक्ष दलित पँथर आणि हजारो समर्थकांसह आज सोमवारी आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन सेनेत विलीन केला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रामभाऊ तायडे यांची पक्षाच्या नेतेपदी नेमणूक केल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी जाहीर केले.

नेत्यांना काही नको पण पक्षाच्या कार्यकर्त्याना राजकीय संधी मिळावी म्हणून शिवसेनेशी (शिंदे गट) युती केली आहे. आगामी काळात दोन्ही पक्षाचे एकत्रित कार्यकर्ते मेळावे होतील. लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत संपूर्ण राज्याचा दौरा करणार असल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी यावेळी सांगितले. देशात जातनिहाय जनगणना होणे आवश्यक असल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

रामभाऊ तायडे यांच्यासह ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष पंढरीनाथ गायकवाड, शहर प्रभारी मायाताई कांबळे, राहुल उंबरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.