ठाणे: ठाणे, मुंबईसह रायगड आणि उर्वरित कोकणात ऑरेंज ॲलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर जिल्ह्याला रेड ॲलर्ट देण्यात आला असून अती मुसळधार पावसाची शक्यता असल्याने येथील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू असून आज पावसाचा जोर अधिकच वाढला आहे. उद्याही पालघर जिल्ह्याला रेड ॲलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून शाळा-महाविद्यालय तसेच अंगणवाड्या यांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून नागरिकांना सतर्क राहण्याचा आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सध्या पालघरच्या पूर्व भागात पाऊस सुरु असून धरणांची पाणी क्षमताही पूर्ण झाली आहे. पालघर जिल्ह्यातील मोठी पाणी क्षमता असलेले सूर्या प्रकल्पाचे धामणी धरण पूर्ण भरले असून या धरणाचे तीन दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. धामणी आणि कवडास या दोन्ही धरणांचे मिळून सूर्या नदीमध्ये जवळपास 9400 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, आज मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडला पावसाचा ऑरेंज ॲलर्ट देण्यात आला होता. सकाळी मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अंधेरी सबवेसारख्या सखल भागात पाणी साचले होते. मात्र या पावसाचा मुंबईच्या वाहतूकीवर आणि रेल्वेच्या वेळापत्रकावर झाला नाही. ठाणे शहरातही काही सखल भागात पाणी साचल्याचे पाहायला मिळाले.