ठाणे शहरातील दोन ठिकाणी संरक्षण भिंती कोसळल्या

ठाणे : जोरदार पावसामुळे शहरातील दोन भागांमध्ये गुरूवारी आणि शुक्रवारी संरक्षण भिंत कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यात गुरुवारी रात्री कळवा परिसरातील सोसायटीची संरक्षण भिंत कोसळली तसेच शुक्रवारी दुपारी पोखरण रोड क्रमांक १ येथील वनविभागाची भिंत कोसळल्याची घटना उघडकीस आली आहे. सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

ठाणे शहरातील कळवा येथील गणपतीपाडा परिसरात गुरुवारी सायंकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास ओम गणेश सोसायटीची संरक्षण भिंत कोसळल्याची घटना घडली. ही भिंत अंदाजे १५ फूट लांब व ५ फूट उंच होती. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. ही घटना घडताच कळवा प्रभाग समिती निहाय आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षिततेच्या दृष्टीने परिसरात धोकापट्टी लावण्यात आले असून संबंधित विभागाला आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

त्याचप्रमाणे, पोखरण रोड क्रमांक १ येथे श्री स्वामी समर्थ मठाच्या समोर शुक्रवारी दुपारी ३.४७ वाजता संरक्षण भिंत कोसळल्याची घटना घडली. येथे रस्त्यालगत असलेल्या वनविभागाच्या संरक्षण भिंतीचा काही भाग कोसळला. ही संरक्षण भिंत अंदाजे २० फूट लांब आणि ६ फूट उंच होती. या घटनेची माहिती मिळताच लोकमान्य-सावरकर नगर प्रभाग समिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंता तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. रस्त्यावर कोसळलेली भिंत आपत्ती व्यवस्थापन कक्षातील जेबीसी मशीनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आली असून रस्त्यावरील अडथळा दूर करण्यात आला आहे.