दीपेश म्हात्रे यांच्या घरी रविंद्र चव्हाण

डोंबिवली: काही दिवसांपूर्वीच शिंदे गटाचे कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे यांनी दीपेश म्हात्रे व कुटुंबियांची भेट घेतली होती. आता त्यानंतर अचानक भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण गणेश दर्शनाकरीता शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या घरी गेले. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

अनेक दिवस दीपेश म्हात्रे भाजपाकडे झुकणार अशी चर्चा होत होती. पण आजच्या या आगळ्या वेगळ्या भेटीने पुढे वेगळी समीकरणे होणार का अशी सर्वदूर विचारणा होत आहे. सोमवारी राजकारणातील कट्टर विरोधक एकत्र दिसले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण गणेश दर्शनाकरीता शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या घरी गेले. शहरात ही बातमी पसरताच सामान्य डोंबिवलीकरांना अचंबा वाटला.

कल्याण डोंबिवली महापालिका प्रभाग रचना जाहीर झाली आहे. ४ सप्टेंबरपर्यंत प्रभाग रचनेवर हरकती सूचना घेण्याची अंतिम मुदत आहे. प्रभाग रचना जाहीर झाली. निवडणूका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी तयारी सुरु केली आहे. विशेष करुन सत्तेतील महायुतीचे दोन पक्ष शिवसेना शिंदे गट आणि भाजपने आपली संपूर्ण ताकद लावण्याची तयारी केली आहे. युती होणार की नाही हे अद्याप अस्पष्ट आहे. परंतु महापौर आपल्याच पक्षाचा असावा यासाठी दोन्ही पक्षांकडून जोर दिला जात आहे. जास्तीत सदस्य निवडून येणार त्या पक्षाचा महापौर पदावर दावा राहणार. यासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडूून माजी नगरसेवकांनी आपल्या पक्षात खेचण्याचे काम सुरु आहे. शिवसेना शिंदे गटात काही माजी नगरसेवकांनी प्रवेश केला. तर डोंबिवलीतील काँग्रेसचे काही माजी नगरसेवक भाजपमध्ये सामिल झाले. या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण आणि दीपेश म्हात्रे यांच्या भेटीबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.