भाईंदर: छोट्या पडद्यावरील मालिका आणि वेब सिरीजमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रिया मराठे यांचे मिरारोड येथील निवासस्थानी निधन झाले आहे. त्या अवघ्या ३८ वर्षांच्या होत्या. प्रिया मराठे या काही वर्षांपासून कर्करोगाने ग्रस्त होत्या. मध्यंतरी या दुर्धर आजारातून त्या बऱ्याही झाल्या. त्यानंतर त्यांनी एक नाटकही केले. मात्र, अलीकडेच कर्करोगाने पुन्हा हातपाय पसरल्याने शनिवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
प्रिया मराठे यांचा जन्म 23 एप्रिल 1987 रोजी झाला. मराठी सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या घरात त्यांचे बालपण गेले. अकरावीमध्ये शिकत असताना त्यांना महाविद्यालयीन नाट्य स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली आणि तिथूनच त्यांच्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात झाली. अभिनयातील वाढते आकर्षण त्यांनी करिअर म्हणून स्वीकारले.
2005 साली ‘या सुखांनो या’ या मराठी मालिकेमधून प्रिया मराठे यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथे मी’, आणि ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकांमधील त्यांच्या सशक्त भूमिकांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. विशेषतः त्यांच्या नकारात्मक भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
हिंदी मालिकांमध्ये त्यांच्या प्रवासाची सुरुवात ‘कसम से’ या मालिकेतील ‘विद्या बाली’ या भूमिकेपासून झाली. पुढे ‘पवित्र रिश्ता’मध्ये ‘वर्षा’ आणि ‘बडे अच्छे लगते हैं’मध्ये ‘ज्योती मल्होत्रा’च्या भूमिकांनी त्यांना घराघरात पोहोचवले. ‘साथ निभाना साथिया’ मालिकेत त्यांनी ‘भावनी राठोड’ ही नकारात्मक पण ठसठशीत भूमिका साकारली होती. मराठी इतिहासावर आधारित ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत त्यांनी ‘गोदावरी’ची भूमिका अतिशय समरसून साकारली. ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतील ‘मोनिका’ ह्या भूमिकेने त्यांची लोकप्रियता अधिकच वाढवली.
प्रिया मराठे यांनी अभिनेता शंतनू मोघे यांच्याशी 24 एप्रिल 2012 रोजी विवाह केला. त्यांनीही ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. प्रिया यांना बॅडमिंटन, प्रवास आणि वाचनाची विशेष आवड होती.
अभिनेत्री प्रिया मराठे यांनी मीरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीतील उत्तन व अन्य ठिकाणी महापालिकेच्या टिम सोबत स्वतः जाऊन समुद्रात व खाड्यात टाकलेला कचरा गोळा करत साफसफाई केली आहे. त्यांना महानगरपालिकेच्या ब्रँड ॲम्बेसेडर करण्यासाठी तत्कालीन आयुक्त दिलीप ढोले व घनकचरा विभागाचे उपायुक्त रवी पवार यांचे मोठे योगदान आहे.