ठाणे: ठाण्यातील ज्येष्ठ नेते राजेश जाधव यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी निवड करण्यात आली असून, या निर्णयामुळे ठाण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राजेश जाधव यांचा पक्षनिष्ठेचा प्रवास तब्बल दोन दशकांचा आहे. 1999 पासून सक्रिय राजकारणात काम करणाऱ्या जाधव यांनी 2002 मध्ये ठाणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस, 2004 मध्ये सेवा दलाचे अध्यक्ष, 2009 मध्ये महापालिका शिक्षण मंडळ सदस्य आणि 2019 मध्ये प्रदेश काँग्रेस सदस्य अशी सातत्याने यशस्वी राजकीय भरारी घेतली आहे. आता 2025 मध्ये त्यांची थेट प्रदेश सचिवपदी वर्णी लागल्याने त्यांची संघटनात्मक ताकद आणि निष्ठेचं मोठं मूल्यांकन झालं आहे. या निवडीनंतर ठाण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
राजेश जाधव यांची ही नियुक्ती आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी महत्त्वाची ठरणार आहे, असा राजकीय जाणकारांचा विश्वास आहे.