नवी मुंबईला पावसाने झोडपले

नवी मुंबई: तीन आठवड्यापूर्वी जोरदार पावसाने नवी मुंबई शहर जलमय होऊन संपूर्ण सीबीडी बेलापूर परिसर पाण्याखाली गेले होते. त्यानंतर रविवारी रात्रीपासूनच पावसाने शहरात दमदार हजेरी लावत संपूर्ण शहराला झोडपून काढले.

तीन आठवडे गायब झालेला पाऊस रविवारपासून पुन्हा परतला. उकाड्याने हैराण झालेल्या नवी मुंबईकरांना पुन्हा पावसाच्या आगमनाने दिलासा दिला आहे. रविवार १५ जूनपासून शहरात रात्री वीजांच्या गडगटासह जोरदार पाऊस झाला. सखल भागांत काही ठिकाणी पाणी तुंबले तर वाहतूकही मंदावली होती. दरवर्षी प्रमाणे तुर्भे एमआयडीसीमधील रस्ते देखील पाण्याखाली गेल्याने वाहतूक देखील मंदावल्याने वाहतूक कोंडी देखील झाल्याचे दिसले. रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहनांमध्ये पाणी जाऊन ठिकाठिकाणी वाहने बंद पडल्याचे दिसत होते.

यंदा तुर्भे एमआयडीसीमधील नालेसफाई झाली असली तरी पाणी निचरा होणारी गटारे तुंबली असल्याने इंदिरानगर परिसरासह बगाडे कंपनीजवळील रस्ते पाण्याखाली गेले असून ठिकठिकाणी पाणी तुंबले होते. पावसाच्या दमदार प्रवेशाने इंदिरा नगर परिसरातील बगाडे कंपनीशेजारी नागरीवस्तीत पावसाचे पाणी साचून संबंध परिसर जलमय झाला होता. बगाडे कंपनी ते शिवाजी टपरी येथून जाणारा गटार पूर्ण तुंबला असल्याने संबंधित मुख्य रस्ता व सेवा रस्ता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले जाते. यावर्षी पावसाळा सुरुवात झाली आणि संबंधित परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले, त्यामुळे नागरिकांना या ठिकाणी ये-जा करण्याकरिता त्रास सहन करावा लागत आहे. तसेच तुर्भे स्टेशनमधील भुयारी मार्गात देखील पाणी साचल्याने प्रवाशांना पाण्यातून वाट काढत फलाटावर जावे लागले तर काही प्रवाशांना त्याच घाणीच्या पाण्यातून चालत कार्यालय व घरी जावे लागले. सोमवारी दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्याने अनेक भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या होत्या.

आयुक्तांचे मुखवटे घालुन आंदोलन करणार?

तुर्भे इंदिरानगर बगाडे कंपनीसमोर दरवर्षी पावसाळ्याचे पाणी साचत असल्याचे नवी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून देखील या विषयाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ही समस्या मार्गी नाही लागली तर याच साचलेल्या पाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख महेश कोटीवाले यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त यांच्या नावाने मुकुट घालून आंदोलन करण्याचा दिला इशारा आहे.