उल्हासनगर: उल्हासनगर कॅम्प क्रमांक ५ मधील गणेशनगर भागात रविवारी सायंकाळी सुमारे ८ वाजता नाल्यावर असलेला पूल कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. पुल कोसळतानाचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या पूलाच्या दुरवस्थेबाबत गेल्या काही वर्षांपासून स्थानिकांनी महापालिकेला वारंवार सूचना देऊनही दखल घेतली गेली नव्हती. अखेर पालिकेच्या दुर्लक्षामुळे पूल कोसळला आणि त्यामुळे परिसरातील सुमारे ५०० घरांचा येण्या-जाण्याचा एकमेव मार्ग बंद झाला आहे.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांत प्रचंड संताप व्यक्त होत असून, महापालिकेच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. नागरिकांनी तातडीने पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याची आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.