पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड हमजा बुरहान ठार

नवी दिल्ली: भारतात २०१९ साली पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलातील ४० जवानांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याचा मास्टरमाईंड हमजा बुरहानची पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञाताकडून हत्या करण्यात आली आहे.

डॉक्टर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या हमजाला अज्ञात बंदुकधाऱ्याने अनेक गोळ्या झाडल्या. मुझफ्फराबाद येथे झालेल्या हल्ल्यात हमजा मारला गेला. पुलवामाचा रहिवासी असलेल्या हमजाला केंद्रीय गृहमंत्रालयाने २०२२ साली दहशतवादी म्हणून घोषित केले होते.

पाकिस्तानचे समर्थन असलेल्या अल-बद्र या संघटनेच्या कामात त्याचा सक्रिय सहभाग होता. तर पुलवामा हल्ल्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती, असे सांगितले जाते. न्यूज १८ ने सुरक्षा दलाच्या सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, हमजाच्या हत्येमुळे जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाचा प्रचार, अतिरेक्यांची भरती आणि त्यांच्या साखळीला मोठा धक्का बसला आहे.

हमजा बुरहान कोण होता?
बुरहानचे खरे नाव अर्जुमंद गुलझार दार असे होते. पुलवामाच्या रत्नीपोरा भागातील खरबतपोरा येथे त्याचा जन्म झाला होता. २०१७ साली उच्च शिक्षणाच्या नावाखाली तो पाकिस्तानला गेला होता. पुढे तो बंदी घातलेली अतिरेकी संघटना अल-बद्रमध्ये सामील झाला आणि या संघटनेच्या कमांडर पदावर पोहोचला.

काश्मीरमध्ये परतल्यानंतर बुरहानने तरुणांमध्ये कट्टरपंथी विचार पसरविण्यास आणि त्यांच्यावर प्रभाव टाकण्यास सुरुवात केली. दक्षिण काश्मीरच्या पुलवामापासून ते सोपियान पर्यंत त्याने त्याचे जाळे पसरवले होते. द प्रिंटने दिलेल्या बातमीनुसार, पुलवामामधील अनेक कुटुंबानी सांगितले की, बुरहानच्या संपर्कात आलेले तरूण दहशतवादाकडे वळू लागले होते.

जम्मू-काश्मीरमधील अनेक दहशतवादी कारवायांशी बुरहान संबंधित होता. तसेच १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथील हल्ल्यातही त्याचा सहभाग होता. जैश-ए-मोहम्मद या संघटनेकडून २०१९ साली सीआरपीएफच्या ताफ्यावर भीषण हल्ला करण्यात आला होता. ज्यात ४० जवानांना प्राण गमवावे लागले होते.

पुलवामा येथील हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने बालाकोट आणि पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक करत या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले होते. पुलवामा येथे हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांना बुरहानने स्फोटके आणि ग्रेनेड पुरवल्याची माहिती सुरक्षा दलांनी दिली होती. १८ नोव्हेंबर २०२० मध्ये सीआरपीएफ जवानांवर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यातही त्याची महत्त्वाची भूमिका होती.

रहस्यमय हत्यांची मालिका
पाकिस्तानमध्ये काही काळापासून लष्कर-ए-तय्यबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन यासारख्या संघटनांमधील अतिरेक्यांच्या आणि उच्चपदस्थ कमांडरना लक्ष्य करत त्यांची हत्या करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता बुरहानचीही हत्या करण्यात झाली आहे. मागच्या महिन्यात पहलगाम हल्ल्याच्या वर्षपूर्तीच्या आधी लष्कर-ए-तय्यबाचा संस्थापक सदस्य अमीर हमजाची लाहोरमध्ये दुचाकीवरील हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. मार्च महिन्यात जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरचा मोठा भाऊ मोहम्मद ताहिर अन्वरची पाकिस्तानमध्ये रहस्यमयरित्या हत्या झाली होती. वर्षभरापूर्वी लष्कर-ए-तय्यबाचा प्रमुख दहशतवादी अबू कतालला पाकिस्तानच्या झेलम सिंधमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी ठार केले होते. मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदच्या जवळचा साथीदार असलेला कताल २०२४ च्या हल्ल्यात सामील होता. या हल्ल्यात नऊ जणांचा मृत्यू झाला होता. २०२३ पासून अशाप्रकारे अनेक अतिरेक्यांच्या रहस्यमय हत्या झाल्या आहेत.