आता आकसाने खंडणीचे गुन्हे दाखल करणे पडणार महागात

सर्वोच्च न्यायालयाचा पोलिसांना चाप

ठाणे : कोणत्याही प्रकारचे पुरावे नसताना आकसाने खंडणीचे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलिसांना सर्वोच्च न्यायालयाने चाप लावला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय करोल आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने ५ जून रोजी खंडणीच्या एका खटल्यात दिलेल्या निर्णयानुसार खंडणी मागणाऱ्या आरोपीच्या विरोधात सबळ पुरावा नसेल तर खंडणीचा गुन्हा दाखल करणे गैर असल्याचे म्हटले आहे. जीवे ठार मारण्याची धमकी देताना वापरण्यात आलेले हत्यार किंवा तसम पुरावा सादर करणे आवश्यक आहे, त्यामुळे असे गुन्हे दाखल करताना पोलिसांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार सध्या वाढले असून आकसापोटी अनेकदा खंडणीचे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार पोलिसांकडून केले जात असल्याचे सर्रास घडत आहेत. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे खोटे गुन्हे दाखल करण्याला चाप लागण्याची शक्यता आहे. काही वर्षांपूर्वी माहिती अधिकारी कार्यकर्त्यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल झाल्याची चर्चा होत आहे. माजी नगरसेविका, नगरसेवक यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले होते. माजी नगरसेवक सुधीर बर्गे यांना अटक देखिल झाली होती. त्यांच्या विरोधातील खटला प्रलंबित असून त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केला होता. त्याला आता न्यायालयात आव्हान देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.