गर्भधारणा चाचणी सकारात्मक; बाहेरील चाचणी मात्र नकारात्मक

शास्त्रीनगर रुग्णालय पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीच्या कथित गर्भधारणा चाचणी अहवालावरून वाद निर्माण झाला आहे. हिमोग्लोबिन कमी असल्याने उपचारासाठी दाखल झालेल्या मुलीची रुग्णालयात तीन वेळा गर्भधारणा चाचणी करण्यात आल्याचा कुटुंबीयांचा दावा आहे.

शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीच्या वैद्यकीय तपासणी अहवालावरून गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. हिमोग्लोबिन कमी असल्याने मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिच्या गर्भधारणेच्या तपासणीचा अहवाल सकारात्मक आल्याचा दावा करण्यात आला आहे.

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयात मुलीची एक-दोन नव्हे तर तीन वेळा गर्भधारणा चाचणी करण्यात आली. या चाचण्यांमध्ये सकारात्मक अहवाल आल्याचा दावा आहे. याशिवाय क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटरमध्ये करण्यात आलेल्या तपासणीचा अहवालही सकारात्मक असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. सोनोग्राफी अहवालही सकारात्मक असल्याचा दावा करण्यात आला आहे.

रुग्णालयातील अहवालावर कुटुंबीयांना विश्वास न बसल्याने मुलीच्या वडिलांनी बाहेरून गर्भधारणा चाचणी किट आणून तपासणी केली. या चाचणीचा निकाल नकारात्मक आल्याचा कुटुंबीयांचा दावा आहे. यानंतर कुटुंबीयांनी पुन्हा संबंधित निदान केंद्राशी संपर्क साधला. या संपूर्ण प्रकारामुळे रुग्णालयातील तपासणी आणि बाहेरील चाचणीच्या निकालांमध्ये कथित तफावत असल्याचा मुद्दा समोर आला आहे. या प्रकारामुळे संबंधित मुलीला मोठा मानसिक धक्का बसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. जवळपास २४ तास ती मानसिक तणावाखाली होती. ‘मी काही केलेले नसताना माझा अहवाल असा का आला?’ असा सवाल करत ती रडत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

याबाबत भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी या प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला असून, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. वैद्यकीय तपासण्यांचे अहवाल, सोनोग्राफी आणि प्रयोगशाळेतील प्रक्रिया यांची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या तक्रारीची गंभीर दखल घेत अतिरिक्त आयुक्त यांच्या निर्देशानुसार या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने तीन सदस्यीय चौकशी समिती गठीत केली असून यामध्ये डॉ. दीपा शुक्ल, डॉ. सादिया पिंजारी, डॉ. सपना रामोळे, यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीला या प्रकरणाची चौकशी करून ८ दिवसांच्या आत अनुपालन अहवाल केडीएमसी आयुक्तांना सादर करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.