ठामपा निवडणुकीचा खर्च सादर केला नाही
ठाणे : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ मध्ये निवडणूक लढविलेल्या मात्र ठरवून दिलेल्या मुदतीत आपल्या निवडणूक खर्चाचा हिशोब सादर न केलेल्या एकूण २४ उमेदवारांना कोकण विभागीय आयुक्तांनी अनर्ह घोषित केले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आणि महानगरपालिका अधिनियम, १९४९ च्या कलम १० (१ई) नुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने विहित मुदतीत निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करणे बंधनकारक होते. परंतु, ठाणे महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी यांच्या अहवालानुसार २४ उमेदवारांनी वेळेत खर्चाचा तपशील सादर केला नाही. या उमेदवारांना नैसर्गिक न्याय तत्त्वाधारे आपली बाजू मांडण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात सुनावणीची संधी देण्यात आली होती. सुनावणीदरम्यान काहींनी उपस्थिती दर्शवली तर काही अनुपस्थित राहिले, परंतु विहित मुदतीत हिशोब सादर न केल्यामुळे या उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या आदेशांचे व तरतुदींचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले.
त्यानुसार कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी आदेश पारित करत संबंधित २४ उमेदवारांना पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी अनर्ह ठरविले आहे. हा अनर्हतेचा कालावधी आदेश जारी झाल्याच्या दिनांकापासून लागू राहील. उमेदवारांना आदेशाच्या दिनांकापासून ६० दिवसांच्या आत राज्य निवडणूक आयोगाकडे विशेष अर्ज दाखल करण्याची मुभा आहे.