इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धाची झळ आपल्याला बसू लागली आहे. त्यामुळे त्यावर जमेल तेवढ्या माहितीच्या आधारे प्रत्येक जण व्यक्त होत आहे. शेअर मार्केट गडगडले म्हणून ज्या धीरगंभीर स्वरात गुंतवणूकदार आपली व्यथा नोंदवत आहेत, त्याच स्वरात भाजीमंडईत भाव वाढण्यामागे युद्धच कारणीभूत आहे, कारण इंधनाचा तुटवडा वगैरे अशी जुजबी चर्चा कानावर पडू लागली आहे. हापूसची निर्यात झाली नाही तर एरवी ‘एक्सपोर्ट क्वालिटी’चा आंबा खाण्याची संधी मिळेल, अशी भाबडी आशाही व्यक्त होऊ लागली आहे. असो, या युद्धाच्या उपकथानकी घडामोडी. प्रत्यक्षात मात्र युद्धसमयी कसे वागावे किंवा वागू नये याचा बोध घेण्याची संधी जगातील सर्वच राष्ट्रप्रमुख घेतील तर बरे. आता हेच पहा ना, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे उन्मत्त विधान. इराणला असा धडा शिकवू की हा देश पाषाणयुगापर्यंत मागे फेकला जाईल. परिणाम काय झाला? या चिथावणीने खवळलेल्या इराण्यांनी अमेरिकेची दोन हवाई जहाजे पाडली. शाब्दिक उद्रेक हा प्रत्यक्ष बॉम्ब वा अग्निक्षेपण हल्ल्यापेक्षा किती घातक ठरतो याचे हे उदाहरण! या लढाऊ विमानाच्या वैमानिकास पकडून आणणाऱ्याला मोठे बक्षिस जाहीर करुन इराणने पाषाणयुगातील मानवी स्वभावाचे जणु दर्शनच घडवले. ट्रम्प यांच्या पत्रकार परिषदा सध्या गाजत आहेत. त्यांना न आवडणारे प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांचा ते सर्रास अपमान करीत असतात. इराणचे लष्करप्रमुखही सडेतोड भाषा वापरुन आपण अमेरिकेला पुरुन उरु, अशी दर्पोक्ती करीत असतात. थोडक्यात आकाशातून पडणाऱ्या बॉम्ब गोळ्यांपेक्षा तोंडातून सुटणारे वाग्बाण एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या देशांच्या चिंधड्या उडवत आहेत. यात आघाडीवर आहेत अर्थातच ट्रम्पमहाशय, ज्यांचे नामकरण आपण तात्या असे करुन टाकले आहे.
नेत्यांनी कसे वागू नये याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे तात्या ट्रम्प! ते किती (मुळात नाहीच!) वाचतात याबद्दल सर्वांनाच शंका आहे. अर्धवट अथवा न वाचलेल्या माहितीआधारे ते पत्रकार परिषदांमध्ये एका पाठोपाठ एक सनसनाटी विधाने करीत जातात. त्यामुळे युद्ध थांबेल असे म्हटले की ते चिघळणार असा अर्थ काढला जाऊ लागला आहे. न वाचता बोलण्याची घाई, तसे न ऐकता मतप्रदर्शन करण्याची तत्परता, या दोन अवगुणांमुळे त्यांनी देशालाच वेठीस धरले आहे. अगम्य आणि अतार्किक विधाने करण्याची अत्यंत अपरिपक्व आणि नेत्याला न शोभणारी सवय आपल्या देशी तात्यांमध्येही असते. त्यामुळे कधी-कधी भ्रष्टाचाराचे समर्थन, महिलांवर होणाऱ्या अत्याचारांस महिलांनाच जबाबदार धरणे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या असो की गच्च भरलेल्या गाड्यांतून पडून प्रवाशांचे होणारे मृत्यू असो, आपले तात्यालोक काहीही बरळत असतात. अशा तात्या लोकांचा आंतरराष्ट्रीय म्होरक्या ट्रम्पसाहेब आहेत. त्यांची ही सवय आपल्या तात्यालोकांना लागल्यामुळे शिवाजीमहाराज असो वा प्रभू श्रीरामचंद्र, यांच्याबद्दलही वादग्रस्त विधाने झाल्याचे आपण अनुभवले!
सत्तेमुळे आपण फार ज्ञानी असतो, हा गोड गैरसमज किंवा फाजिल आत्मविश्वास आजच्या देशी-विदेशी सर्वच नेत्यांचे (अव) गुणवैशिष्ट्य बनले आहे. विषय ट्रम्पवरुन निघाला असल्याने अमेरिकेचे भूतपूर्व अध्यक्ष अब्राहम लिंकन यांचा एक सुविचार इथे उद्धृत करावासा वाटतो. लिंकन म्हणाले होते: लोकांनी मूर्ख ठरवण्यापेक्षा शांत रहाणे केव्हाही चांगले. अन्यथा शब्दांचे तारे तोडून आपल्या मूर्खपणावर शिक्कामोर्तबच होते. सर्वसामान्यपणे माणूस अन्य प्राणीजीवापेक्षा बोलण्याच्या वरदानामुळेच वेगळा ठरत असतो. त्याच्या आणि तिच्याही बोलण्याचा शास्त्रोक्त अभ्यास झाला आहे. महिला अर्थात पुरुषांना मागे टाकतात, हा विनोदाचा नव्हे तर अभ्यासपूर्ण अहवालाचा निष्कर्ष आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, स्वित्झरलॅण्ड आदी देशांत बायका जागेपणी (म्हणजे दिवसा!) 13,349 शब्द बोलतात. पुरुषांमध्ये ही सरासरी 11,950 आढळली. भारतीय तत्वज्ञानात शांत रहाण्याचे आणि आत्मचिंतनाचे महत्व बुद्धाने अधोरेखित केले आहे. ॠषी-मुनींची हजारो वर्षांची तपश्चर्या एकही शब्द न उच्चारता होणे असो की ध्यानधारणेने आत्मसिद्धी आणि चंचल मनावर (अर्थात जिभेवरही) ताबा मिळवला जातो. इतके सारे असूनही भारतीय राजकारणातील तात्या लोकांचे शब्द विंचवासारखे डंख मारीत असतात. भारतीय समाज सध्या प्रचंड अस्थिरतेने ग्रासण्यामागे शब्दांचा कल्लोळ हेच कारण आहे. ही स्थिती युद्धापेक्षा कमी नाही. अर्थात हे युद्ध आपले आपल्याशीच आहे. शांततेचे कवच झुगारुन शब्दांची शस्त्रे आपण निर्बुद्धपणे वापरत आहोत. हे आत्मघातकी आहे. आपल्यामधील तात्यांना आपण काबूत ठेवत नाही, ही खरी समस्या आहे. आखातात सुरु असलेल्या युद्धाची ही बोधकथा पटते ना?