ठाणे: मुंबई येथील माटुंगा जिमखाना येथे २६ ते २९ मार्च २०२६ दरम्यान पार पडलेल्या मनोज रामचंद्रन मेमोरियल राज्यस्तरीय ओपन बॅडमिंटन स्पर्धेत ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत १ रौप्य व २ कांस्य पदकांची कमाई केली. विविध वयोगटांमध्ये ठाण्याच्या खेळाडूंनी दाखवलेली सातत्यपूर्ण आणि लढाऊ कामगिरी विशेष लक्षवेधी ठरली.
ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडांगणातील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल येथे सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेअंतर्गत चालणाऱ्या ठाणे बॅडमिंटन अकॅडमीतील खेळाडूंनी या स्पर्धेत आपली छाप उमटवत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
पुरुष एकेरी गटात सर्वेश यादवने अत्यंत प्रभावी खेळ करत रौप्य पदक पटकावले. उप-१६ फेरीत विश्वजीत थाविलला १५-१, १५-५ अशा एकतर्फी सामन्यात पराभूत करत दमदार सुरुवात केली. उपांत्यपूर्व फेरीत आर्यन एप्टेला १५-१०, १५-८ अशा सरळ सेटमध्ये हरवत त्याने आपली लय कायम राखली. उपांत्य फेरीत हर्षित महिमकरविरुद्धचा सामना अत्यंत चुरशीचा ठरला. २१-१६, १७-२१, २१-१६ अशा रोमहर्षक लढतीत विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला, मात्र संपूर्ण स्पर्धेत दाखवलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे रौप्य पदकाची कमाई केली.
११ वर्षांखालील मुलांच्या एकेरी गटात योहान नायरने उत्कृष्ट खेळ करत कांस्य पदक जिंकले. ३२ फेरीत नामिष कामतला १५-७, १५-३ अशा सरळ सेटमध्ये हरवले. त्यानंतर १६ फेरीत जिआन घिया विरुद्धचा सामना अत्यंत रंगतदार ठरला. १५-१३, १३-१५, १६-१४ अशा थरारक लढतीत विजय मिळवत पुढील फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीत मिरेक सेरेजोल १५-२, १५-४ अशा एकतर्फी सामन्यात पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत कडवी झुंज देत पराभव पत्करावा लागला.
महिला एकेरी गटात आर्या कोरगावकरने देखील उल्लेखनीय कामगिरी करत कांस्य पदकाची कमाई केली. ३२ फेरीत टियान कॅस्टेलिनोला १५-५, १५-८ अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले. त्यानंतर १६ फेरीत अन्विषा घोरपडेला १५-७, १५-३ अशा सहज विजय मिळवत पुढे सरसावली. उपांत्यपूर्व फेरीत अनन्या शिंदेविरुद्धचा सामना अत्यंत चुरशीचा ठरला. पहिला सेट गमावल्यानंतर जबरदस्त पुनरागमन करत ९-१५, १६-१४, १५-७ असा विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला, मात्र तिची एकूण कामगिरी कौतुकास्पद ठरली.
या यशाबद्दल मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड यांनी समाधान व्यक्त करत सांगितले की, “राज्यस्तरीय स्पर्धेत आमच्या खेळाडूंनी दाखवलेली सातत्यपूर्ण कामगिरी अत्यंत अभिमानास्पद आहे. प्रत्येक खेळाडूने आपल्या क्षमतेनुसार सर्वोत्तम प्रयत्न करत पदकांची कमाई केली आहे. त्यांच्या मेहनतीमुळे आणि शिस्तबद्ध प्रशिक्षणामुळेच हे यश शक्य झाले आहे.