ठाणे: ठाणे महापालिकेचे माजी उपायुक्त शंकर पाटोळे लाच प्रकरणाचा तपास मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ठाणे विभागाकडे हस्तांतरित केला आहे. ठाणे लाचलुचपत विभागाने तपासाला सुरुवात केली असून यात पाटोळे यांच्या वैयक्तिक संपत्तीबरोबरच त्यांचे मूळ गाव आणि नातेवाईकांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे.
विकासक अभिजित कदम यांच्याकडून २५ लाखांची लाच घेतल्याप्रकरणी मुंबई लाचलुचपत विभागाकडून ठाणे महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांची सुमारे पाच तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर हा संपूर्ण तपास ठाणे लाचलुचपत विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. सोमवारी पाटोळे यांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. एका सरकारी अधिकाऱ्यावर लाचलुचपत विभागाने केलेली ठाणे जिल्ह्यातील ही सर्वात मोठी दुसरी कारवाई असल्याचे बोलले जात असून या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी होण्याची शक्यता आहे. लाचलुचपत विभागाने कारवाई केल्यानंतर शंकर पाटोळे यांची नेमकी संपत्ती किती आहे याबाबत पालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु आहेत. मात्र तपासाचा भाग म्हणून ठाणे लाचलुचपत विभागाकडून केवळ पाटोळेच नाही तर त्यांचे नातेवाईक आणि त्यांच्या गावापर्यंत चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे.
सध्या ज्या दिवशी घटना घडली त्यासंदर्भातील पुरावे तपासण्याचे काम या विभागाकडून सुरु आहे. १५ ते २० दिवसांमध्ये सखोल चौकशी झाल्यानंतर पाटोळेंच्या विरोधात आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
आजी-माजी अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करा-आ.केळकर
आतापर्यंत कोर्ट आणि लाचलुचपत विभागाकडूनच ठामपा अधिकाऱ्यांवर कारवाया झाल्या. ठाणे महापालिकेने वादग्रस्त सर्वच आजी-माजी अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करावी, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. अधिकाऱ्यांना पाठीशी घातल्यानेच अशा अधिकाऱ्यांकडून मोठा भ्रष्टाचार होत आहे. काही अधिकारी प्रामाणिकपणे काम करत असले तरी अनेक अधिकारी राजरोसपणे भ्रष्टाचार करत आहेत. एवढेच काय, महापालिकेचे ऑडिट देखील होत नाही. त्यामुळे ठाणेकरांची सर्व बाजूंनी आर्थिक लूट होत असल्याचा आरोप श्री.केळकर यांनी केला.