ठाणे: पातलीपाडा येथे एकाच ठिकाणी ठाणे महापालिकेच्या चार शाळा असून सुमारे १८०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या मुलांसाठी पटांगण आणि वाढीव खोल्यांसाठी आधीच्या आरक्षणात बदल करून या शाळांसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी ठाणे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने केली आहे.
पातलीपाडा येथे ठाणे महापालिकेच्या शाळा क्र. २१, २५, ५३ आणि ५४ एकाच वास्तूत असून येथील विद्यार्थ्यांना जागा अपुरी पडत असून जागेअभावी अनेक सुविधांपासून त्यांना वंचित राहावे लागत आहे. येथील होरायझन हॉस्पिटलमागे एसटीसाठी भूखंड आरक्षित असून त्यालगतचा भूखंड ठाणे परिवहन सेवेसाठी आरक्षित करण्यात आले आहे. या आरक्षणात बदल केल्यास या शाळांमधील मराठी, इंग्रजी आणि हिंदी माध्यमाच्या बालवाडी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सुविधांसह शिक्षण घेता येईल, असे मत काँग्रेसचे श्री. डी. जे. बक्षी यांनी व्यक्त केले आहे.
घोडबंदर मार्गावर पातलीपाडा ही जागा मध्यभागी असून या परिसरात मागासवर्गीय आणि गरीब कुटुंबे मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. सध्या असलेल्या आरक्षित भूखंडांच्या आरक्षणात अदलाबदल करून शाळांसाठी आरक्षण दिल्यास येथील तळागाळातील समाजातील मुलांसाठी दर्जेदार शिक्षणाची सोय होऊ शकेल, अशी मागणी, श्री.बक्षी यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.